मुंबई : कोरोना काळातील निर्बंधांमुळे मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. हाॅटेल आणि सेवा क्षेत्रातील तब्बल पाच लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मुंबईतील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे.
राज्य सरकार आणि टास्क फोर्सने तातडीने मुंबईतील निर्बंध कमी करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन देवरा यांनी केले आहे. मुंबईची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तर अक्षरशः ठप्प झाले आहेत. त्यासोबतच सेवा क्षेत्रातील पाच लाख रोजगार धोक्यात आले आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल करून दुकाने, हाॅटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी देवरा यांनी केली आहे.
याशिवाय, कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवासातून मुभा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शासकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. लसीकरण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवासाची मुभा दिल्यास लसीकरणालाही प्रोत्साहन मिळेल. लाॅकडाऊन आणि प्रवासाच्या वाढलेल्या खर्चामुळे मुंबईचे अर्थकारण कोसळले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घ्यावा, असेही देवरा म्हणाले.