Join us

पाच लाख झाडांमुळे मुंबईची फुप्फुसे बनली ‘हिरवीगार’

By सचिन लुंगसे | Published: November 28, 2023 9:38 AM

व्हर्टिकल गार्डन, टेरेस गार्डन आणि मियावाकी पद्धतीचा प्रभावी वापर.

मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बिल्डरसह रेडी मिक्स काँक्रीट प्लांटला नोटीस धाडल्या जात असतानाच मुंबईतली हवा शुद्ध करण्यासाठी व्हर्टिकल गार्डन, टेरेस गार्डन आणि मियावाकी पद्धतीचा वापर करत मोकळ्या जागांवर हिरवळ तयार केली जात आहे. विशेष म्हणजे या पद्धतीचा वापर करत मुंबईत २०२० सालापासून आजपर्यंत तब्बल ५ लाख ४० हजार झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे मुंबईची ही फुप्फुसे ‘हिरवीगार’ झाली आहेत. महापालिकेने ही मोहीम हाती घेतल्यानंतर काही एनजीओ आणि व्यावसायिक संघटनांचीदेखील मदत घेतली आहे.

मुंबईत वृक्षारोपणाला मर्यादा आहेत. यावर उपाय म्हणून व्हर्टिकल गार्डन म्हणजे भिंतींना लागून उद्यान उभे केले जाते. टेरेस गार्डन म्हणजे गच्चीवर झाडे लावली जातात. मियावाकी पद्धतीने म्हणजे उड्डाणपुलाखाली किंवा जिथे जिथे जागा उपलब्ध होईल; तेथे हिरवळी तयार केली जात आहे. २६ जानेवारी २०२० रोजी मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यास सुरुवात करण्यात आली. या पद्धतीमध्ये देशी-प्रजातींची झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. 

 

कोणत्या झाडांचा केला समावेश ?वृक्षांमध्ये कदंब, तामण, बदाम करंज, सीताअशोक, शिरीष, रतन गुंज, समुद्र फूल, चिंच, जांभूळ, आवळा, फणस, तुती, करवंद बेहडा, सावर, अर्जुन, टेटू, डिकेमाली काळा कुडा, कुंभी, शमी, पांढरा खैर, शिसू, कवठ, यासारख्या फळे-फुले आणि औषधी गुणधर्म असलेल्या प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे. 

 

मुख्य झाडांची रोपे लावणे हाच उद्देश:१९६९ पासून डॉ. अकिरा मियावाकी यांनी जपानमधील वनस्पतींचा अभ्यास करून अशाप्रकारची वने विकसित केली आहेत. डॉ. मियावाकी यांचा उद्देश मुख्यतः या प्रदेशातील मूळ वृक्षांच्या प्रजातींचा वापर करून संभाव्य नैसर्गिक वनस्पतींच्या शक्य तितक्या मुख्य झाडांची रोपे लावणे हा आहे.

उद्यान विभागाच्या अखत्यारित्यात १, १०० भूखंड आहेत. १, १०० पैकी ४०० उद्याने आहेत. उर्वरित राखीव जागा आणि खेळाची मैदाने आहेत. त्यापैकी ज्या जागा मोठ्या आहेत; तिथे झाडे लावण्यात आली आहेत. काही खासगी भूखंडावर झाडे लावण्यात आली आहेत. २०२० पासून आतापर्यंत ७० ते ८० मोठ्या भूखंडावर ५ लाख ४० झाडे लावण्यात आली आहेत - जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, महापालिका.  

 

नैसर्गिकरीत्या  जंगल विकसित: ज्या दिवसापासून झाडे लावली जातात, त्या दिवसापासून ही झाडे वैयक्तिक स्पर्धेद्वारे वाढत असतात. ही झाडे पाच वर्षांनंतर चार मीटर, दहा वर्षांनंतर आठ मीटर आणि २५ वर्षांनी २० मीटरपर्यंत पोहोचतात. तीन वर्षांनी नैसर्गिकरीत्या वैविध्यपूर्ण जंगल वाढते. अनेक पक्षी आणि किटकांच्या प्रजाती पुन्हा परतल्या आहेत. जपान सरकारनेदेखील  या उपक्रमाची दखल घेतली असून, पत्राद्वारे कौतुक केले आहे.

टॅग्स :मुंबईनागरी समस्या