मुंबई : पाच लाख रुपयांसाठी शिल्पकार हेमा उपाध्याय आणि अॅड. हरिश भंबाणी यांचा खून केल्याचा कयास आहे. साधू राजभरने विद्याधरच्या सांगण्यावरून हेमा आणि हरीश भंबानी यांच्या तोंडात बोळा कोंबला, असे कबूल केले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने सोमवारी ताब्यात घेतलेल्या साधू राजभरचे म्हणणे पोलीस नोंदवून घेत आहेत. साधूला वाराणसीत बडागाव येथील कविरामपूरच्या गोसाईपूर येथे उत्तर प्रदेशच्या एसटीएफने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. मी लोखंडी फॅब्रिकेशनचे काम करतो. मी हेमाच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला तो ‘सरांनी’ तसे सांगितले म्हणून. मी उत्तर प्रदेशातील कविरामपूरचा, असे साधूने माध्यमांना सांगितले. हे ‘सर’ कोण असे विचारले असता साधूने विद्याधर राजभर असे नाव सांगितले.पोलिसांनी साधू राजभरकडून ११ डेबिट आणि क्रेडिट कार्डस् जप्त केले. त्यातील सहा हेमाचे व पाच भंबानीचे होते. शिवाय चिंतन उपाध्ययचे व्हिजिटिंग कार्डही मिळाले आहे. विद्याधरचे वडील चिंतनसाठी फॅब्रिकेशनचे काम करायचे. त्यांच्या निधनानंतर चिंतनने व्यवसायात विद्याधरला मदत केली होती. पाच लाख रुपयांसाठी त्यांनी त्या दोघांचा खून केला असे आम्हाला वरकरणी वाटत नाही. जे नजरेस पडते आहे त्यापेक्षा वेगळे कारण असणार आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाला. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार साधूने सांगितले की ते हेमाच्या घरी पूर्वी ४-५ वेळेस गेले होते व तिने पाच लाख रूपये देण्यास नकार दिला होता. हे पैसे ती त्यांना देणे लागत होती. पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर विद्याधरने तिला संपविण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. नक्की कुठे बिनसले ?विद्याधर राजभर उर्फ गोटूचे वडील हे शिल्प बनविण्याच्या व्यवसायात गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. त्यांच्यासोबत हेमा यांचे पती चिंतन यांचे व्यावसायिक संबंध होते. नंतर जेव्हा हेमा यांचे चिंतन सोबत फिस्कटले. तेव्हा हेमाने राजभरसोबत व्यावसायिक संबंध निर्माण केले. मात्र केलेल्या कामाची एक रक्कम गेल्या अनेक महिन्यांपासून हेमा यांनी रखडवून ठेवली होती. वारंवार विनवण्या करूनही त्या पैसे देत नव्हत्या. त्यामुळे अखेर संतापलेल्या गोटूने हेमा यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांना कांदिवलीला बोलावण्यात आले. भांबानींना मारण्याचा त्याचा उद्देश नसून यात नाहकच त्यांचा बळी गेला, अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे. सुपारी देऊन हत्या?हेमा उपाध्याय आणि हरिश भंबानी यांची सुपारी देऊन निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे एक पथक तपास कामात सक्रिय झाले आहे. हेमा यांचे पती चिंतन यांच्याबाबतची सर्व माहिती मिळविली जात आहे. हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय यांच्याशी गेल्या काही वर्षांपासून पराकोटीचा वाद होता. त्यामागे जुहू येथील फ्लॅटची मालकी हे एक प्रमुख कारण होते. त्यामुळे हेमा व त्यांच्याबाजूने उच्च न्यायालयात बाजू मांडणारे अॅड. भंबानी यांची हत्या याच कारणावरुन झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सांताक्रुझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसांताक्रुझ स्मशानभूमीत सोमवारी दुपारच्या सुमारास हेमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पती चिंतनलाही पोलिसांच्या सुरक्षेत स्मशानभूमीत आणले होते.अंदाज चुकला : पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे हत्याकांड नियोजनबद्ध आहे. मृतदेह एकदा नाल्यात बुडविले की प्लास्टीक व कार्डबोर्डसह ते पाण्यात बुडतील, असा आरोपींचा कयास होता. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.वर्कशॉप सील : लालजीपाडा येथील ज्या वर्कशॉपमध्ये हेमा आणि भंबानीची हत्या करण्यात आली तो वर्कशॉप पोलिसांनी सील केला आहे.शिवकुमारला आम्ही मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपविले आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. - दलजित चौधरी, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कायदा सुव्यवस्था, उत्तर प्रदेश
पाच लाखांसाठी घडले हत्याकांड?
By admin | Published: December 15, 2015 4:33 AM