Join us

नाकाबंदीत पायधुनीत साडे बारा लाख जप्त

By admin | Published: October 01, 2014 2:37 AM

नाकाबंदीदरम्यान पायधुनी पोलिसांनी एका तरुणाकडून साडे-बारा लाखांची रोकड हस्तगत केली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून, या रकमेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई : नाकाबंदीदरम्यान पायधुनी पोलिसांनी एका तरुणाकडून साडे-बारा लाखांची रोकड हस्तगत केली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून, या रकमेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांचे वाटप केले जाते. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. अशाच प्रकारे पायधुनी पोलिसांकडून भेंडी बाजार परिसरात सोमवारी नाकाबंदी लावण्यात आली होती. या वेळी रिझवान कुरेशी हा तरुण टॅक्सीतून संशयास्पदरीत्या जात असताना पोलिसांना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने त्याच्या जवळ असलेली बॅग लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये पोलिसांना 12 लाख 34 हजार पाचशे रुपयांची रोकड आढळून आली. 
या तरुणाकडे पोलिसांनी पैशांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय त्याच्याकडे या पैशांबाबत कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती देऊन त्याला अटक केली. हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील राहणारा असून, त्याने ही रक्कम कुठून 
आणली, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पायधुनी पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)