पाच मंडईंचा होणार पुनर्विकास; मीनाताई ठाकरे फुल मार्केटचाही कायापालट

By जयंत होवाळ | Published: January 15, 2024 07:32 PM2024-01-15T19:32:30+5:302024-01-15T19:33:05+5:30

मंडईच्या  पुनर्विकासात तीन ते चार मजल्यांचे बांधकाम केले जाणार असून फुल विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मजला असेल

Five mandas will be redeveloped, Meenatai Thackeray Full Market will also be redeveloped | पाच मंडईंचा होणार पुनर्विकास; मीनाताई ठाकरे फुल मार्केटचाही कायापालट

पाच मंडईंचा होणार पुनर्विकास; मीनाताई ठाकरे फुल मार्केटचाही कायापालट

मुंबई :  होलसेल फुलांची विक्री केल्या जाणाऱ्या  दादर मधील स्व. मीनाताई ठाकरे मंडईचा  पुनर्विकास केला जाणार असून मंडईच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम मुंबई महापालिकेने  सुरु केले आहे. सध्या तळ मजल्याच्या स्वरूपात असलेल्या या मंडईत फुल विक्रीसोबत अन्य वस्तूंच्या विक्रीसाठीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ही मंडई पूर्णपणे फुल विक्रेत्यांसाठी असून दोन वर्षांपूर्वी येथील मासळी विक्रेत्या महिलांचे बांधकाम तोडण्यात आले होते. या प्रकाराविरोधात महिलांनी  प्रचंड संताप व्यक्त केला होता.

मंडईच्या  पुनर्विकासात तीन ते चार मजल्यांचे बांधकाम केले जाणार असून फुल विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मजला असेल. अन्य वस्तू विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले जातील.  याआधी पालिकेने तीन मंडयांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. महात्मा ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचे काम ४० टक्क्यापेक्षा जास्त  झाले आहे.  शिरोडकर मंडईचेही काम सुरु असून हेही काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. बाबू  गेनू मंडईचे काम सुरु असून ही सर्व कामे लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चेंबूर भाऊराव चेंबूरकर मंडईच्या जुन्या इमारतीचे बांधकाम तोडण्यात आले असून गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था  म्हणून शेड बांधून देण्यात आली  आहे.  'सी' वॉर्डातील आदमजी पिरजी मंडई तोडण्यात आली असून पर्यायी शिबिराचे बांधकाम सुरु आहे. खेरवाडी मंडईच्या वास्तूचे बांधकाम तोडून नव्याने बांधकाम करण्यात येत आहे.

या मंडयांचा होणार पुनर्विकास
बोरिवली मंडई , अंधेरी नवलकर मंडई, चेंबूर लक्ष्मण बाबू मोरे मंडई , मालाड सोमवार बाजार आणि मीनाताई ठाकरे फुल मार्केट .
दुरुस्ती सुरु असलेल्या मंडया  
मिर्झा गालिब मंडई , ग्रांट रोड लोकमान्य टिळक मंडई, फोर्ट मंडई, जिजामाता मंडई, जे.बी. शहा मंडई, डोंगरी मंडई.  तर, आणखी आठ मंडयांचीही दुरुस्ती केली जाणार आहे.

Web Title: Five mandas will be redeveloped, Meenatai Thackeray Full Market will also be redeveloped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.