दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 11:46 IST2024-10-06T11:04:01+5:302024-10-06T11:46:44+5:30
चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
मनीषा म्हात्रे
Chembur Siddharth Colony Fire : चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीत खाली दुकानात झोपलेले दोघेजण मात्र बचावले आहेत. स्थानिकांनी सुरुवातीला पीडित कुटुंबियांना वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र आगीच्या भडकल्यामुळे त्यांना लवकर बाहेर काढता आले नाही. यामुळे कुटुंबातील सर्वजण होरपळले गेले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले.
चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कॉलनीच्या के. एन. गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर १६ येथील छेदिराम अलगुराम गुप्ता (७० वर्ष) यांच्या राहत्या घराला आग लागली. गुप्ता यांचे राहते घर १+२ पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली.
दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकली. त्यावेळी छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे घराबाहेर पडले. मात्र घरामध्ये गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकून पडले. त्यामुळे सर्वजण आगीमुळे होरपळले. स्थानिक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जखमींना चेंबुरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेत प्रीती प्रेम गुप्ता ही जखमी असून तिला पुढील उपचाराकरता राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या व ॲम्बुलन्स पोहोचल्या होत्या. घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यात आली असून पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.