पाच कोटी भारतीय मानसिक आजाराने त्रस्त, आजारांमागे सोशल मीडिया ठरतोय कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:50 AM2018-04-20T02:50:02+5:302018-04-20T02:50:02+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर बारा पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो आहे. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर बारा पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो आहे. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ब्रिटिश जर्नल आॅफ सायकिएॅट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५० लाख लोक मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्ततेचे आजार यामुळे मरण पावतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मानसिक रोगी आहेत. त्याचप्रमाणे पाच कोटी भारतीय अशा मानसिक अवस्थेशी लढत आहेत. २०२२पर्यंत ‘नैराश्य’ हा दुसरा सर्वांत मोठा आजार असेल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.
याविषयी समुपदेशक तरनुम डोब्रियाल सांगतात, गेल्या १० वर्षांत कुटुंबातील माणसांचा एकमेकांशी संवाद तुटला आहे. आकडेवारीनुसार मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तरुण पिढी २४ तासांपैकी सर्वाधिक तास मोबाइलचा वापर करीत आहे. हा वापर करताना आभासी जगामध्ये प्रवेश करतात व यातून मानसिक आजार होण्याची दाट शक्यता असते.
मनोविकारतज्ज्ञ डॉ. सोनल आनंद सांगतात, व्यक्तीची झोप बिघडणे, भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एकलकोंडेपणा, दैनंदिन कामकाजात टाळाटाळ किंवा चुका, वजन खूप कमी होणे किंवा वाढणे, खूप भीती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जीव घाबरणे, कामकाजाची इच्छा कमी होणे, आत्महत्या करण्याची धमकी देत राहणे तथा प्रयत्न करणे, मनात आत्महत्येचा विचार येणे इत्यादी मानसिक आजारांची लक्षणे दिसून येतात.
आॅफिसमध्ये संगणकाचा वापर हा अनिवार्य आणि हिताचा आहे; परंतु सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो याची जाणीव त्यांना करून देणे महत्त्वाचे आहे.
लहानग्यांच्या हातात मोबाइल देताना काळजी घ्या
बालकांतील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तवणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भीती इत्यादी लक्षणे दिसून येतात. विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे आहे. आज तीन वर्षांच्या मुलाच्या हातात मोबाइल देत आहोत. त्याच्या कोवळ्या डोळ्यांवर आणि मेंदूवर काय विपरीत परिणाम होत असेल, याचासुद्धा विचार आपण करीत नाही.