५० लाख विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:13 AM2018-04-26T01:13:30+5:302018-04-26T01:13:30+5:30
ब्रिटिश कौन्सिलचा राज्य सरकारशी करार : कलाकारही होणार प्रशिक्षित
मुंबई : राज्यातील ५० लाख विद्यार्थ्यांना इंग्रजीचे विशेष धडे देण्यासाठी ब्रिटीश कॉन्सिलने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनाही इंग्रजीचे शिक्षण दिले जाणार आहे. यासंबंधी कॉन्सिलचे संचालक अॅलन गेम्मेल आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लंडन दौऱ्यावेळी उभय देशांमध्ये शिक्षण व संस्कृतीसंबंधी आदान-प्रदान वाढविण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला महाराष्टÑ राज्य सरकारने सर्वात आधी प्रतिसाद दिला. त्याअंतर्गत राज्यातील भावी पिढीला जागतिक स्तरावर सक्षम करण्यासाठी उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाचा कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या पार्श्वभूमीवरच हा करार केला जात असल्याचे अॅलन गेम्मेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाकांक्षी कृती आराखडा हाती घेतला आहे. हा आराखडा तडीस नेण्यासाठी या प्रकल्पात टाटा ट्रस्टची मदतही घेतली जाणार आहे. ट्रस्टच्या निधी सहकार्यातून कॉन्सिलअंतर्गत ३० हजार शिक्षकांना इंग्रजीसाठी तयार केले जाईल. हे ३० हजार शिक्षक ट्रस्टशी संलग्न असलेल्या १५ लाख विद्यार्थ्यांना इंग्रजीत निपूण करतील. त्यामुळे भविष्यात हे विद्यार्थी जागतिक स्तरावर स्वत:ला सिद्ध करू शकतील. शिक्षक व विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देणे, उच्च शिक्षण घेणाºयांना अतिरिक्त कौशल्य देणे व कला क्षेत्रात आदान-प्रदान करणे यासंबंधीचा हा सामंजस्य करार आहे.
१४ महिलांना शिष्यवृत्ती
मुंबईत मुख्यालय असलेल्या ब्रिटीश कॉन्सिलचे यंदा ७०वे वर्ष आहे. यानिमित्ताने कॉन्सिलकडून राज्यातील १४ महिलांची इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीच्या स्वरुपात या महिलांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी मदत केली जाईल.