पाच महिन्यांपासून लोककलावंतांचे मानधन रखडले; निधीच्या तुटवड्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:30 AM2019-07-04T04:30:43+5:302019-07-04T04:31:23+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखानुदान सादर करण्यात आले होते.
मुंबई : राज्यातील सुमारे ३0 हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. वृद्धकलावंतांच्या मानधनासाठी २०१८ नोव्हेंबरच्या अधिवेशनच्या अंदाजपत्रकात २०१९-२०२० वर्षासाठी ४९ कोटी ८१ लाख ३० हजार रुपयांच मागणी सांस्कृतिक विभागाने केली होती, परंतु सांस्कृतिक कार्य विभागाला २ कोटी २० लाखच मंजूर झाले. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून वृद्धकलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागले. परिणामी, हा निधी गेल्या पाच महिन्यांपासून रखडला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखानुदान सादर करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने वयोवृद्ध लोककलावंतांच्या मानधनासाठी नोव्हेंबर, २०१८ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला, परंतु केलेल्या मागणीच्या निम्मी रक्कमसुद्धा न मिळाल्याने गरीब-गरजू लोककलावंतांचे मानधन पाच महिने रखडले. अशा स्थितीत अनेक वयोवृद्ध लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून, काहींना औषधोपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याची परिस्थिती आहे.
निधी प्राप्त न झाल्याचे सांस्कृतिक विभागाने २०१९ मार्च आणि मे महिन्यात सरकारला कळविले होते. निधीच्या कमतरेमुळे मानधनाचे वाटप करता आले नसल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले. चालू अधिवेशनात लोककलावंतांच्या मानधनासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यांना हे मानधन जुलैच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील वयोवृद्ध कलावंतांना सध्या ‘अ’, ‘ब’, ‘क’ या वर्गवारीनुसार अनुक्रमे २,१00, १,८00 आणि १,५00 रुपये दरमहा मानधन मिळते.