Join us

खोब्रामेंढा जंगलातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीत पाच नक्षलवादी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात चकमक होत आहे.

कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरात शनिवारी सकाळी पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करत पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला होता. यानंतर त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले.

सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरुष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते.

टीसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून घातपात घडविण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. नक्षलवाद्यांचा तो डाव हाणून पाडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६०चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित आहेत.

मृत नक्षलवाद्यांवर होते ४३ लाखांचे बक्षीस

ठार झालेल्या पाचही मृत नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी मेंबर भास्करचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून ४३ लाखांचे बक्षीस होते, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.