जेजेमध्ये कला, डिझाईन, आर्किटेक्चरवर पाच नवे अभ्यासक्रम
By रेश्मा शिवडेकर | Published: June 18, 2024 09:34 PM2024-06-18T21:34:12+5:302024-06-18T21:34:25+5:30
मुंबई -कला, डिझाईन, आर्किटेक्चर क्षेत्रातील व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन या विषयात अधिक स्पेशलाईज्ड असे पाच नवीन अभ्यासक्रम स्वायत्त दर्जा ...
मुंबई-कला, डिझाईन, आर्किटेक्चर क्षेत्रातील व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन या विषयात अधिक स्पेशलाईज्ड असे पाच नवीन अभ्यासक्रम स्वायत्त दर्जा मिळालेल्या सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अॅण्ड डिझाईनतर्फे सुरू करण्यात येणार आहेत.
यात मेट्रोपोलिटीन आर्किटेक्चर, टायपोग्राफी आणि टायपो डिझाईन, कम्युनिकेशन अॅण्ड एक्पिरिअन्स डिझाईन, आर्किटेक्चरल एज्युकेशन, डिझाईन एज्युकेशन अशा काही विषयांचा समावेश आहे. यात पदवी-पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम यंदापासून सुरू केले जातील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी दिली.
जेजे स्कुल ऑफ आर्ट अशी ओळख असलेली ही संस्था १८५७ पासून अस्तित्त्वात आहे. या संस्थेला या शैक्षणिक वर्षापासून डि नोव्हा (स्वायत्ततेचा एक प्रकार) दर्जा देण्यात आला आहे.
सध्या संस्थेच्या प्रांगणात कला, आर्किटेक्चर, अप्लाईड आर्टवरील अभ्यासक्रम राबविले जात आहेत. संस्थेचे जुने अभ्यासक्रम सुरू राहणार आहेत. केवळ राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्यांच्या स्वरूपात बदल केला जाईल. चॉईस्ड बेस्ड क्रॉस क्रेडि़ट्स, अभ्यासक्रम प्रवेश आणि बाहेर पडण्याचे पर्याय यात दिले जातील. यात ड्रॉईंग, व्हिज्युअल फंडामेंटल्स, कला आणि संस्कृतीचा इतिहास, इंग्रजी संभाषण आणि पर्यावरण अभ्यास असे चार कोअर विषय असतील. तर इतर आवडीनुसार निवडता येतील.
या शिवाय कला आणि डिझाईनच्या क्षेत्रात सर्वसमावेशक, आंतरविद्याशाखीय आणि शाश्वत शिक्षण देण्याची हमी देणारे नवे अभ्यासक्रम राबविण्याच्या दृष्टीने संस्थेने तयारी सुरू केली आहे. लवकरच या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे नोटीफिकेशन निघेल. पदव्युत्तर संशोधन (पीएचडी) स्तरावरही एनईपीच्या अनुषंगाने बदल करण्यात आले आहेत.