मुंबई हायकोर्टासाठी पाच नवे न्यायाधीश, ‘कॉलेजियम’कडून पहिल्यांदाच निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:49 AM2019-03-26T05:49:50+5:302019-03-26T05:50:10+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने अविनाश जी. घारोटे, एन. बी. सूर्यवंशी, माधव जामदार, अनिल किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव या पाच वकिलांना मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस सोमवारी केंद्राला केली.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने अविनाश जी. घारोटे, एन. बी. सूर्यवंशी, माधव जामदार, अनिल किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव या पाच वकिलांना मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस सोमवारी केंद्राला केली.
उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर गेल्या १० मे रोजी न्यायाधीशपदी नेमण्यासाठी १० वकिलांची नावे पाठविली होती. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रमणा यांचा समावेश असलेल्या ‘कॉलेजियम’ने वर उल्लेख केलेले वकील नेमणुकीसाठी योग्य असल्याचा निर्णय घेतला. न्या. बोबडे यांचा सहभाग असलेल्या ‘कॉलेजियम’कडून मुंबई उच्च न्यायालयासाठी न्यायाधीश निवडले जाण्याची ही पहिली वेळ आहे.
मुख्य न्यायाधीशांनी सुचविलेली अविनाश एस. देशमुख, मंजरी धनेश शहा, जे. आर. शहा व देवीदास पांगम या चार वकिलांची नावे उच्च न्यायालयाकडे परत पाठविण्याचे कॉलेजियमने ठरविले. अभय कुमार आहुजा या आणखी एका नावाच्या संदर्भात मुख्य न्यायाधीशांकडून अधिक माहिती मागविण्याचे ठरवून तोपर्यंत निर्णय राखून ठेवला. या नेमणुका झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ७६ होईल.