मुंबईत सहापैकी पाच जागा भाजपला? पुन्हा धक्कातंत्र, शिंदे गटाला अवघी एक जागा  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 06:31 AM2024-03-06T06:31:58+5:302024-03-06T06:32:35+5:30

भाजपच्या उमेदवारीबाबत धक्कादायक निर्णय होऊ शकतात असे संकेत मिळाले आहेत.

Five out of six seats in Mumbai for BJP only one seat for the Shinde group | मुंबईत सहापैकी पाच जागा भाजपला? पुन्हा धक्कातंत्र, शिंदे गटाला अवघी एक जागा  

मुंबईत सहापैकी पाच जागा भाजपला? पुन्हा धक्कातंत्र, शिंदे गटाला अवघी एक जागा  

मुंबई : मुंबईतील सहापैकी पाच जागा आपण लढवाव्यात आणि एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावी असा भाजपचा प्रयत्न असल्याचे समजते. भाजपच्या उमेदवारीबाबत धक्कादायक निर्णय होऊ शकतात असे संकेत मिळाले आहेत.

दक्षिण मुंबईत भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. कारण, तेथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपचे उमेदवार असल्यासारखा प्रचार आधीच सुरू केला आहे. शिवसेनेकडून तेथे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.

दिल्लीत भाजपने सहापैकी पाच उमेदवार जाहीर केले आणि त्यात चार मतदारसंघात नवीन चेहरे दिले. हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, गौतम गंभीर यांच्यासारख्या दिग्गजांना संधी नाकारली. आता मुंबईतही भाजप दिल्ली पॅटर्न आणणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. तसे झाले तर त्या धक्कातंत्राचा फटका दिग्गजांना बसू शकतो.

सध्या मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), पूनम महाजन (उत्तर मध्य) आणि मनोज कोटक (उत्तर पूर्व) हे तीन खासदार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिमची जागा आपल्याकडे खेचण्याचा आणि दक्षिण-मध्य ही एकच जागा शिवसेनेला देण्यास भाजप इच्छुक असल्याचे समजते. मात्र, शिंदे यांनी शिवसेनेसाठी तीन जागांची मागणी केली आहे. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम या तीन जागांचा समावेश आहे. महायुतीत अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला मुंबईत एकही जागा दिली जाणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.

उमेदवारीबाबत संभ्रम
- जाणकारांच्या मते, राहुल नार्वेकर यांनी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात तेव्हाच केली, जेव्हा त्यांना पक्षाने त्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. 
- मात्र, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मनोज कोटक हे विद्यमान खासदार असूनही त्यांना असा कोणताही सिग्नल पक्षाने अद्याप दिलेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी नक्की आहे की नाही, या बाबत समर्थकांमध्ये संभ्रम आहे. 
- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल लोकसभानिवडणूक लढले, तर त्यांना शेट्टी यांचा मतदारसंघ दिला जाईल की पूनम महाजन यांचा, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
 

Web Title: Five out of six seats in Mumbai for BJP only one seat for the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.