दोघांना वाचविण्यात यश, दोघांचा मृत्यू, एकाचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी काहीजण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले. याच दरम्यान पाचजण समुद्रात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचविण्यात यश आले, तर दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.
बुडालेले पाचही जण चार बंगला परिसरात राहणारे आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास वर्सोवा गावातील पाटील गल्ली क्रमांक २ येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. पालिकेकडून समोर आलेल्या माहितीत पाचही जण ज्याठिकाणी उभे होते, त्याठिकाणी गणपती विसर्जन सुरू नव्हते. प्रवेश नसतानाही ते किनाऱ्याजवळ आले. त्याच दरम्यान तोल जाऊन ते समुद्रात बुडाले. ही बाब गणेश विसर्जनासाठी बोटीने जात असलेल्यांंच्या लक्षात येताच दोन तरुणांनी समुद्रात उडी घेत दोघांना वाचविले. त्यांना सुखरूप किनाऱ्यालगत पोहोचवताच तेथून दोघांनाही कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अन्य तिघांच्या बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या बचावकार्यादरम्यान दुपारच्या सुमारास शुभम राजनलाल निर्मल (वय १८), संजय हिरामन तावडे (२०) या तरुणांंचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. संजय याचा मृतदेह कुपर रुग्णालय, तर शुभम याचा मृतदेह बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल येथे नेण्यात आला आहे. उर्वरित एका तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली आहे.