Join us

२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:13 AM

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे.

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वांत मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडुप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्यापैकी ९०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ९९० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्याची पावसाळ्यापूर्वीची मोहीम सध्या हाती घेण्यात आली आहे. यामुळे २४ एप्रिलपर्यंत पालिकेकडून संपूर्ण मुंबई क्षेत्रासाठी होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणीकपात केली आहे.

नागरिकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचते पाणी - 

१) मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. 

२) मुंबईच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी तलाव आहे. सातही तलावांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पुरवठा होतो. त्यानंतर पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणण्याचे काम २,४०० मिलीमीटर ते ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांतून आणि ५,५०० मि.मी व्यासाच्या काँक्रीटच्या भूमिगत जलबोगद्यांतून होते. 

३) पाणी शुद्धीकरणासाठी पिसे पांजरापूर, भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. निर्जंतुकीकरण केलेले पाणी पुढे शहरातील जलाशयापर्यंत पोहोचविले जाते.

टॅग्स :मुंबईपाणीकपात