लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकाच आयुक्तालयात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या पाच पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची मराठवाडा, विदर्भात साइड ब्रँचला उचलबांगडी करण्यात आली आहे.
मुंबईतील चार व ठाण्यातील एका अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. पोलीस मुख्यालयातून मंगळवारी त्यांच्या बदल्यांबाबतचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव म्हटले असले तरी त्यांना शिक्षेच्या स्वरूपात बदली करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
मुंबईतील केदारी पवार यांची जळगावला, सचिन कदम यांची औरंगाबाद, नंदकुमार गोपाळे यांची जालना, तर सुधीर दळवी यांची नानवीजला बदली करण्यात आली आहे. ठाणे शहरात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या नितीन ठाकरे यांची नंदुरबारला बदली करण्यात आली आहे.
पाचही जण राज्य सरकारच्या रडारवर असलेल्या दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मर्जीत अधिकारी समजले जातात. पोलीस महासंचालकांच्या वतीने अप्पर महासंचालक के.के. सरंगल यांनी बदल्यांचे आदेश जारी केले.
......................................