मुंबई : औषध निर्मिती आणि संशोधनाचे ११०० कोटी रुपये खर्चाचे पाच मोठे प्रकल्प येत्या पाच वर्षांत राबविण्यात येणार असून त्यासाठीचा सविस्तर आराखडा येत्या १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. हाफकिन नावारुपाला आणण्यासाठी नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चाधिकार समितीने ११०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांची शिफारस केली होती.हाफकिनने गेल्या सहा महिन्यात जवळपास २८ कोटीहून अधिक लसीची निर्मिती केली आहे. राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणे आवश्यक आहे आणि लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे संशोधन होण्यासाठी वेळोवेळी निधीची आवश्यकता भासत असते. हाफकिन इन्स्टिट्यूटला निधी मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक सीमा व्यास आणि हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय राठोड यांनी बैठकीदरम्यान सादरीकरण केले. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय राठोड उपस्थित होते.स्वतंत्र टीम तयार हाफकिन इन्स्टिट्यूटला निधी मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाणार आहे.
हाफकिनमार्फत राबविणार ११०० कोटींचे पाच प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 4:25 AM