श्वानाच्या ‘त्या’ पाच पिल्लांचे गूढ कायम; मालाड पोलिसांकडून तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:41 AM2019-02-12T05:41:58+5:302019-02-12T05:42:15+5:30
मालाड येथील आदर्श सोसायटीतीतील श्वानाच्या ५ पिल्लांचे गूढ अजूनही कायम असून, रविवारी मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीकडेही सीसीटीव्हीबाबत विचारणा केली, मात्र घटनेला महिना उलटून गेल्यानंतरही महिनाभराचा सीसीटीव्ही रेकॉर्ड सोसायटीकडून मिळालेला नाही.
मुंबई : मालाड येथील आदर्श सोसायटीतीतील श्वानाच्या ५ पिल्लांचे गूढ अजूनही कायम असून, रविवारी मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीकडेही सीसीटीव्हीबाबत विचारणा केली, मात्र घटनेला महिना उलटून गेल्यानंतरही महिनाभराचा सीसीटीव्ही रेकॉर्ड सोसायटीकडून मिळालेला नाही. या प्रकरणी मालाड पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मार्वे रोड परिसरात असलेल्या आदर्श को-आॅप. हाउसिंग सोसायटीतून १० जानेवारी रोजी श्वानाची ५ पिल्ले गायब झाल्याची माहिती प्राणिमित्र भावीन भट यांना मिळाली. त्यांनी याबाबत सोसायटीतील तरुण मोहित यांच्यामार्फत सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली तेव्हा, सोसायटीतील कमिटीच्या सांगण्यावरून पिल्लांना मीठचौकी येथील नर्सरी परिसरात सोडून दिल्याचे त्याने सांगितले.
या नर्सरीलगतच मोठा नाला आहे. याच नाल्यात या पिल्लांना फेकले का, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. महिनाभराने मालाड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी त्यांना काहीही सापडले नाही. शिवाय, सोसायटीत सीसीटीव्हीबाबत विचारणा केली असता, महिनाभराचा रेकॉर्ड नसल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले. त्यात आता सुरक्षारक्षकानेही आपण यासंदर्भात काहीच माहिती दिली नव्हती, अशी भूमिका घेत, तक्रारदाराचे म्हणणे खोडून काढले आहे. तर मदतीसाठी आलेला मोहित हा तरुण कमिटीवरील सदस्याचा मुलगा आहे. त्यामुळे त्यानेही काहीही मदत करू शकत नसल्याचे तक्रारदाराला सांगितले. सध्या त्याच्या सर्वच गोष्टींवर निर्बंध आल्याचेही त्याने तक्रारदाराला सांगितले. त्यामुळे सगळेच या प्रकरणात पाठ फिरवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदार भट यांनी केला आहे.
पडताळणी सुरू : तपास अधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पिल्ले स्वत:हून निघून गेल्याचे सोसायटीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्या पिल्लांचे नेमके काय झाले? यामागे आणखी कुणाचा हात आहे का? वादातून हा प्रकार घडत आहे का, याची शहानिशा सुरू आहे. सर्व बाजूंनी कसून तपास सुरू असून जाबजबाबांची सत्यता पडताळून पाहत असल्याचेही पवार यांनी सांगितले.