बांधकाम मजुरांसाठी पाच रुपयांत जेवण, लवकरच योजनेची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:29 AM2019-03-05T05:29:14+5:302019-03-05T05:29:21+5:30
मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या चार शहरांमध्ये बांधकाम मजुरांना लवकरच पाच रुपयांत सोमवार ते शनिवार जेवण देण्याची योजना सुरू होत आहे.
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या चार शहरांमध्ये बांधकाम मजुरांना लवकरच पाच रुपयांत सोमवार ते शनिवार जेवण देण्याची योजना सुरू होत आहे. योजनेला दीनदयाळ उपाध्यायांचे नाव दिले जाणार आहे.
कामगार विभागांतर्गत येणाऱ्या बांधकाम मजूर मंडळाच्या माध्यमातून ही योजना चालविली जाणार असून त्यासाठी शासन अनुदान देणार आहे. चपाती, डाळ, भाजी, चटणी वा वरण-भात, भाज्या अशा पद्धतीचे गरमागरम जेवण बांधकाम मजूर ज्या ठिकाणी रोज उभे राहतात त्या नाक्यांवर (ठिय्या) हे जेवण सकाळी ते कामावर निघण्यापूर्वी पोहोचविले जाईल. भविष्यात मोठमोठ्या टाऊनशिपच्या ठिकाणी जिथे पाचशेहून अधिक मजूर काम करतात तेथे दुपारी जेवण पोहोचविण्याचे विचाराधीन आहे.
या योजनेसाठीचे कंत्राट चार कंत्राटदारांना देण्यात आले असून त्यांना अत्याधुनिक व स्वयंचलित स्वयंपाकगृह उभारण्याची अट टाकण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी उभारणी केली आहे. २० हजार मजुरांना दरदिवशी जेवण पुरविण्याची त्यांची क्षमता आहे. ही योजना सुरुवातीला चार शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असली तरी पुढील टप्प्यात ती राज्याच्या अन्य भागांतही सुरू करण्यात येणार आहे.
मजुरांना एक कार्ड दिले जाईल ते स्वॅप केल्यानंतरच जेवण दिले जाईल. त्यासाठीची यंत्रणा जेवण तयार करणाऱ्या कंत्राटदाराकडून राबविली जाईल. त्यावरून रोज किती मजुरांना जेवण दिले याची नोंद अचूक नोंद होईल. लोकसभा निवणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये २०१७ मध्ये अशी योजना लागू करण्यात आली.