चौथ्या सत्राचा निकाल जाहीर, कट ऑफ घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जेईई मेन चौथ्या सत्राच्या निकालात तब्बल ४४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहे. या निकालानुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला असून, यामध्ये राज्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अथर्व तांबट, सौरभ कुलकर्णी, अमेय देशमुख, स्नेहदीप गायेन आणि गार्गी बक्षी अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
जेईई मेनचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी आयोजित केली जाते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्डसाठी पात्र होतात. जेईई मेनची परीक्षा यंदा देशातील ३३४ शहरात ९२५ केंद्रांवर घेण्यात आली होती. सत्र ४मध्ये एकूण ७.३२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. एकूण ४४ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळविले आहेत. १८ जणांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरण्यासाठी कट-ऑफ ८७.८९ इतका निश्चित झाला आहे. हा कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. याचबरोबर एनटीएने मे २०२१ मध्ये प्रस्तावित पण कोरोनामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या चौथ्या टप्प्यातील जेईई मेन २०२१मध्ये उपस्थित झालेल्या उमेदवारांची ऑल इंडिया रँक आणि परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार आहे. त्याचा निकाल १५ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. जेईई ॲडव्हान्स निकालानंतर आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट (एएटी) घेण्यात येईल. आयआयटीमधील आर्किटेक्चर प्रोग्रॅममध्ये प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्ड एएटी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा १५ ऑक्टोबरला होणार आहे.