‘पाच चोर’ आणि ‘पंचवीस गाड्या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:28 AM2017-07-19T03:28:14+5:302017-07-19T03:28:14+5:30

जुन्या चाव्या वापरून एक सोडून तब्बल २५ ‘महेंद्र बोलेरो पिकअप’ गाड्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सोमवारी एमआयडीसी पोलिसांना यश आले. या प्रकरणी

'Five Thieves' and 'Twenty Five Trains'! | ‘पाच चोर’ आणि ‘पंचवीस गाड्या’!

‘पाच चोर’ आणि ‘पंचवीस गाड्या’!

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जुन्या चाव्या वापरून एक सोडून तब्बल २५ ‘महेंद्र बोलेरो पिकअप’ गाड्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सोमवारी एमआयडीसी पोलिसांना यश आले. या प्रकरणी एकूण आठ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अजून दोघा फरार चोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
सुजीत गौड (२६), अनिल गोडके (५१), वसीम अहमद हुसैन शेख उर्फ वसिम बाटला (३०), अफजल हुसैन लेस मोहम्मद खान उर्फ बाबूभाई (१८), नीलेश शर्मा उर्फ गुड्डू (२६), अभय पाटील उर्फ बारक्या (२४), अरमान खान (२३) आणि शक्ती सिंग (२१) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील चोरांची नावे आहेत. तर गौड हा या टोळीचा म्होरक्या आहे. नीलेश, अभय, अरमान आणि शक्ती हे नालासोपाऱ्याचे राहणारे आहेत. धुळ्याचे राहणारे सुजीत, वसीम आणि अफजल तर जळगावचा अनिल हे चोरीच्या गाड्या विकत घ्यायचे. ८ जुलै रोजी एमआयडीसी परिसरातून एक महिंद्र बोलेरो पिकअप गाडी चोरीला गेली होती. ज्याची तक्रार गाडी मालकाने एमआयडीसी पोलिसांकडे केली. याबाबत परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीन रेड्डी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी एका पथकाची नियुक्ती केली. ज्यात पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, प्रवीण राठोड यांचा समावेश होता. रेड्डी यांना गुप्त बातमीदाराकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. ज्याची शहानिशा करत असताना पवार यांच्या हाती गौड लागला. त्याचे मोबाइल सीडीआर तपासण्यात आले. त्यातून वसीम, अफजल तसेच अनिलची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत नालासोपाऱ्यातून बाकीच्या चोरांना अटक करण्यात आले.
या अटक केलेल्या आरोपींकडून मुंबई उपनगर, नवी मुंबई, पालघर परिसरातून पंचवीस गाड्यांची चोरी करण्यात आली होती. ज्यात एमआयडीसीतून चोरी झालेल्या गाडीचा समावेश आहे, जी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
गेल्या तीन ते साडे तीन वर्षांपासून हे लोक गाडीचोरी करत आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत पोलीस तपास करत आहेत. या चोरांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर फरार चोरदेखील लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘पिकअप’ गाडीच का?
आठही चोरांनी चोरलेल्या २५ गाड्या या महिंद्र कंपनीच्या बोलेरो पिकअप आहेत. त्यामुळे पोलिसांनी याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा धुळे आणि जळगाव परिसरात वाहतुकीसाठी आणि व्यवसायासाठी याच गाडीची मागणी अधिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार याच गाड्यांना त्यांनी टार्गेट केले होते.

अशी होती कार्यपद्धती
गौड आणि नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आलेले पाच जण मुरलेले वाहनचालक आहेत. ते एखादी महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी हेरायचे. त्यानंतर रात्री अडीच ते साडे चारच्या दरम्यान जुन्या चावीला थोडेफार घासून ती गाडी स्टार्ट करायचे आणि अवघ्या चार ते पाच तासांत धुळे किंवा जळगावला या गाड्यांची विक्री करायचे. एक गाडी पन्नास ते ऐशी हजारांपर्यंत विकून ते पैसे आपापसांत वाटून घ्यायचे.

Web Title: 'Five Thieves' and 'Twenty Five Trains'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.