Join us  

कंत्राटी पद्धतीवर पाच हजार आशासेविकांची भरती करणार, आरोग्य खात्याकडून मुंबईसाठी नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 1:29 PM

आरोग्य खात्याच्या माध्यमातून मुंबईसाठी आशा आरोग्यसेविकांची कंत्राटी व मोबदला तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : पालिका प्रशासनाकडून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत सुमारे पाच हजार ५७५ आशासेविकांची पदे कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात येणार आहेत. मुंबईतील नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालिकेच्या वतीने सातत्याने उपाययोजना व सेवासुविधा वाढ केली जात आहे.

आरोग्य खात्याच्या माध्यमातून मुंबईसाठी आशा आरोग्यसेविकांची कंत्राटी व मोबदला तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पालिकेने अर्ज मागविले आहेत. या आशासेविकांना दरमहा सहा हजार रुपयांपर्यंत कामावर आधारित मोबदला तत्त्वावर मानधन मिळणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुरू केली आहे.

आशासेविकापदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज पालिकेच्या ए ते टी विभाग कार्यालयांमध्ये स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे (आरोग्य) मिळू शकेल. ३१ मार्च २०२३ हा अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे. पात्रताधारक इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे. 

काय आहेत पात्रतेचे निकष?वयोमर्यादा २५ ते ४५ असावी. उमेदवार साक्षर व किमान दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले अपेक्षित आहे. इच्छुक आशा स्वयंसेविका उमेदवार या संबंधित विभागातील शक्यतो जवळ निवासस्थान असणाऱ्या अपेक्षित आहेत, जेणेकरून त्यांना कामकाज सुलभतेने करता येईल.

१ हजार ८८ आशासेविकासद्यस्थितीत साधारण एक हजार ८८ आशासेविका, तर २ हजार ८०० आरोग्यसेविका कार्यरत आहेत. आरोग्य केंद्रात एक हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व अंदाजे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने  नेमणूक करण्यात येणार आहे.

..अशी असेल कार्यकक्षा आशासेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. तसेच असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची जबाबदारीही असणार आहे.

टॅग्स :मुंबई