- शेफाली परब
मुंबई : तंबाखूचे सेवन जीवघेणे ठरू शकते, याची जाणीव असली तरी त्याचे व्यसन मात्र पिच्छा सोडत नाही. मग दररोजच्या जीवनातला ताणतणाव दूर करण्यासाठी अनेकांना त्या एका कीकची गरज वाटते. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत तासनतास बस चालवावी लागत असल्याने चालकांमध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण अधिक असते. मात्र बेस्ट उपक्रमाच्या मॅजिक मिक्समुळे आतापर्यंत पाच हजार बेस्ट कर्मचारी तंबाखूमुक्त झाले आहेत.
बेस्ट चालक, वाहक, नवघाणी कामगार तर काहीवेळा अधिकाऱ्यांनाही तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे. मात्र तंबाखूचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण ठरते. त्यामुळे २०१४ पासून बेस्ट उपक्रमामध्ये तंबाखूमुक्त मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बेस्टच्या दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४५० कर्मचाऱ्यांच्या तोंडात डाग (मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे) दिसला. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचार देऊन तंबाखूमुक्त करता आले.
तंबाखूचे व्यसन सुटण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कुमार सिंघल यांनी तंबाखूसारखाच मात्र घरगुती व आरोग्यदायी पदार्थ तयार केला आहे. जिरे, ओवा, दालचिनी, बडीशेप, लवंग बारीक करून तांदळाच्या मॅजिक मिश्रणाचा वापर करत अनेक कर्मचाऱ्यांनी तंबाखू सोडल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले.
तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रोत्साहनतंबाखूमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये बेस्ट उपक्रमामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही मार्गदर्शन केले जात आहे. तसेच तंबाखू सोडलेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव इतर कर्मचाऱ्यांना सांगितला जातो. त्याचबरोबर पुन्हा तंबाखूचे व्यसन जडू नये यासाठी सतत या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केली जाते. याकरता बेस्ट उपक्रमाने विशेष समूह तयार केला आहे.