पाच वर्षांत पाच हजार लहानग्यांना झाली रक्ताच्या कर्करोगाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:36 AM2022-02-04T08:36:29+5:302022-02-04T08:36:48+5:30
गेल्या पाच वर्षांत टाटा मेमोरिअल रुग्णालयाने रक्ताचा कर्करोग झालेल्या पाच हजार बाल रुग्णांवर उपचार केले आहेत.
- स्नेहा मोरे
मुंबई : कोरोनाच्या काळात कमी झालेले अन्य आजारांचे निदान व उपचार प्रक्रिया आता पूर्वपदावर येत आहे. परिणामी, अन्य आजारांचे रुग्ण निदान वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत टाटा मेमोरिअल रुग्णालयाने रक्ताचा कर्करोग झालेल्या पाच हजार बाल रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यात दिलासादायक बाब म्हणजे, हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सकारात्मक असल्याची बाब जागतिक कर्करोग दिनानिमित्त समोर आली आहे.
टाटा मेमोरिअलचे पिडीअट्रीक ओन्कोलॅजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणावली यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ ते २०२१ या कालावधीत टाटा रुग्णालयात ५ हजार ल्युकेमियाग्रस्त (रक्ताचा कर्करोग) झालेले बालरुग्ण दाखल झाले. यात ३,५०० मुलांचा तर, १,५०० मुलींचा समावेश आहे. यात वय नवजात बालक ते १५ वर्षांपर्यंतचे आहे. ल्युकेमियाग्रस्त बालकांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्के आहे, हे सकारात्मक असून समाजाच्या विविध घटकांतील लहानग्यांवर टाटा रुग्णालयात उपचार केले जातात. आजही समाजामध्ये कर्करोगाबद्दल नकारात्मक भावना आहे. कारण या रोगाचा अपरिहार्य अंत मृत्यू हाच असतो, असा समज सर्वसाधारणपणे समाजात आढळतो. मात्र, वैद्यकीय शास्त्रातील नवीन प्रयोगांमुळे आता कर्करोग बरा होणे शक्य झाले आहे.
यामुळे होतो लहान मुलांना कर्करोग
लहान मुलांमध्ये देखील कर्करोग होतो. रक्ताच्या कर्करोगास जनुकामधील दोष आणि पर्यावरणातील प्रतिकूल घटक हे कारणीभूत असतात.
ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे आदी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. बालरोगतज्ज्ञ या लक्षणांच्या आधारावर योग्य ते तपासणी करून मार्गदर्शन करतील.