‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 09:36 AM2023-12-02T09:36:25+5:302023-12-02T09:36:56+5:30

गेल्या दहा महिन्यांत  ४९० अल्पवयीन मुलीसह ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या.

Five thousand crimes in ten months in mumbai | ‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे

‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे

मुंबई : गेल्या दहा महिन्यांत  ४९० अल्पवयीन मुलीसह ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. यापैकी ७७१ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे, तर ९८८ अल्पवयीन मुलीसह एकूण ९९८ जणी बेपत्ता झाल्या आहेत. अपहरणाच्या दाखल गुन्ह्यांपैकी ९१७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकड़ेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईत याच महिलांसंबंधित  दहा महिन्यांत ५,११९ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी ३,९२३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.  यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत मुंबईत महिला संबंधित अत्याचाराच्या ४ हजार ९६८ गुन्हे नोंद झाले. यामध्ये ४९० अल्पवयीन मुलींसह ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. यापैकी ९२६ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.  


उपाययोजनांचे काय?

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर  मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये महिला सुरक्षा कक्ष आणि निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली.  

लग्नाच्या आमिषाने अत्याचार :

गेल्या वर्षी याच दहा महिन्यात मुंबईत बलात्काराच्या ८०७ घटनांची नोंद झाली. यामध्ये ७२९ गुन्हे हे अल्पवयीन मुलींशी संबंधीत होते. गेल्या वर्षी ९३५ अल्पवयीन मुलीसह ८२० तरुणी  आरोपीच्या जाळ्यात अडकल्या. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.

सोशल मैत्रीच करतेय घात...  

गेल्या तीन वर्षांत मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणाकडून सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालातून समोर आली. यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सतर्क राहण्याच्या सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.


वडील, भावाकडून अत्याचार :

अल्पवयीन मुलांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव करून देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात ये आहे. २३ महिलांवर वडील, भाऊ तसेच मुलाकडून लैगिक अत्याचाराच्या नात्याला काळिमा फासण्याचा  घटना घडल्या आहेत. नातेवाईक (४२), कुटुंबातील मित्र (५१), लिव्ह इन पार्टनर (९), केअरटेकर (१) तसेच अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून (२८) बलात्काराच्या घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे.

Web Title: Five thousand crimes in ten months in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.