"ठाकरे सरकारच्या हट्टामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका, आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 01:51 PM2020-12-16T13:51:28+5:302020-12-16T15:29:36+5:30
आदित्य ठाकरे बालिशपणा करत असल्याचे सांगत राजीनामा देण्याची मागणी किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.
ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटपणामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका बसला असल्याची घणाघाती टीका भाजप नेता किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईतीलमेट्रो प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे पाच वर्षांसाठी लांबला असून याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला असल्याची टीका त्यांनी केली.
कांजूरमार्ग येथील जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्यावर राज्य सरकारने मेट्रोचे बांधकाम करणे हे खोटेपणाचे काम असून त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी यावेळी केली आहे. तसेच मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे बालिशपणा करत असल्याचे सांगत राजीनामा देण्याची मागणी किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.
ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले व OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप सोमय्या यांनी केला. 2008 साली ठामपा ने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली. त्याच अनुशंगाने येत्या शुक्रवारी सोमया ठाण्यातील वर्तक नगर पोलिस स्टेशनला सरनाईक विरोधात फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत.