Join us

राज्यात पाच हजार नवे कुष्ठरोगी, प्रत्यक्ष पाहणी केल्याने संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 5:48 AM

राज्याच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या कुष्ठरोग शोध अभियानामुळे, तब्बल पाच हजार नवीन कुष्ठरोगी आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या कुष्ठरोग शोध अभियानामुळे, तब्बल पाच हजार नवीन कुष्ठरोगी आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे लपून राहिलेले रुग्ण सापडल्याने कुष्ठरोग्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला.राज्यात कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढल्याबाबत भाजपाचे सुजितसिंह ठाकूर, काँग्रेसचे आनंद पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखीत आरोग्यमंत्र्यांनी कुष्ठरोगींची संख्या वाढल्याचे मान्य केले. राज्याच्या कुष्ठरोग शोध अभियानात शंभर टक्के ग्रामीण लोकसंख्येची तपासणी केली. या पाहणीत ४ हजार ८९४ नवे कुष्ठरोगी आढळून आले. या पाहणी अभियानात सर्वाधिक ४०१ नवे रुग्ण पालघर जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्ह्यात ३८२ रुग्ण; तर उस्मानाबाद जिल्ह्यात १५४ नवीन कुष्ठरोगी आढळले असून, नव्या रुग्णांची संख्या ४ हजार ८९४ असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.देशातून कुष्ठरोग पूर्णत: हद्दपार झाला नसतानाही केंद्र सरकारने कुष्ठरोग निर्मूलन झाल्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारच्या या घाईमुळे प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य खात्याच्या प्रक्रियेला खीळ बसली. कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आल्यास, नागरिकांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे नवे धोरण आखले. मात्र, याला प्रतिसाद मिळाला नाही. या रोगाबाबत असलेल्या समजांमुळे रुग्ण घराच्या बाहेर येऊन रुग्णालयापर्यंत पोहोचलेच नाहीत. या चुकीच्या धोरणाचा थेट परिणाम कुष्ठरोग्यांची संख्या वाढण्यात झाली.