कर्करोग रुग्णांसाठी पाच हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:45+5:302021-05-10T04:07:45+5:30
देशभरातील टाटा मेमोरिअलच्या शाखांसाठी अमेरिकेच्या संस्थेने दिला मदतीचा हात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टाटा मेमोरियल केंद्राने आणि भारतीय ...
देशभरातील टाटा मेमोरिअलच्या शाखांसाठी अमेरिकेच्या संस्थेने दिला मदतीचा हात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा मेमोरियल केंद्राने आणि भारतीय अमेरिकन देणगीदार यांच्या माध्यमातून पाच हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर कर्करुग्णांना उपलब्ध करून दिले असल्याची माहिती टाटा हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली. संपूर्ण देशभरातील रुग्णालयांतील कर्करुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी हे प्रयत्न सुरू होते.
ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचा फायदा कर्करुग्णांना होणार आहे. या संदर्भात डॉ. बडवे यांनी सांगितले की, वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचे उत्पादन वाढविण्याबरोबरच, टाटा ट्रस्ट आणि इतर स्वयंसेवी संस्थांसारख्या समाजसेवी संस्था मोठ्या ऑक्सिजनिअर्सच्या खरेदीसाठी मदत करतात. त्यातून जागतिक स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कर्करुग्णांसाठी लागणारी ही वैद्यकीय उपकरणे घेऊन मालवाहू विमाने रविवारी मुंबईत तसेच दिल्लीत दाखल झाली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी आणलेली ही तिसरी आणि चौथी फेरी असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले. यात राष्ट्रीय कर्करोग ग्रिड (एनसीजी)चा भाग असलेल्या २०० हून अधिक रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याचे आणि वाटप करण्याचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. एस. प्रमेश आणि एपिडेमिओलॉजीचे उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यावेळी उपस्थित होते. नॅशनल कॅन्सर ग्रिडचे समन्वयक डॉ. प्रमेश यांनी सांगितले की, आम्ही रुग्णालयांकडून उपकरणे व उपभोग्य वस्तूंसाठी विनंती करून कोविड-१९ संसर्गाच्या सध्याच्या घटनांचे नकाशे तयार केले. दुसरी लाट एका नवीन प्रकाराशी संबंधित असून तरुणांच्या फुप्फुसांवर परिणाम करते आणि मृत्यू ओढवू शकताे. मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे आयसीयू बेड, औषधे आणि ऑक्सिजनचा अभाव असल्याने हे पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर गरजू रुग्णांसाठी मदत करील. शिवाय घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना, तर रुग्णालयात बेडवर असलेल्या रुग्णांनाही हे कॉन्संट्रेटर आधार देईल, असे यावेळी सांगण्यात आले.
................................