ठेकेदारांना दररोज पाच हजार दंड

By Admin | Published: June 4, 2017 02:59 AM2017-06-04T02:59:17+5:302017-06-04T02:59:17+5:30

रस्त्यांच्या कामांसाठी वाढवलेली दुसरी डेडलाइनही शनिवारी संपली. मात्र, अद्यापही अडीचशे रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे आता निविदेतील अटी अनुसार

Five thousand penalties for contractors everyday | ठेकेदारांना दररोज पाच हजार दंड

ठेकेदारांना दररोज पाच हजार दंड

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रस्त्यांच्या कामांसाठी वाढवलेली दुसरी डेडलाइनही शनिवारी संपली. मात्र, अद्यापही अडीचशे रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे आता निविदेतील अटी अनुसार काम पूर्ण होईपर्यंत या विलंबासाठी ठेकेदारांना दररोज पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. मात्र, पावसाळा तोंडावर असल्याने या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी फार कमी अवधी उरला आहे. परिणामी, पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेने या वर्षी सुमारे आठशे रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. प्रत्येक विभागात तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार, रस्त्यांचे प्राधान्य क्रम ठरवण्यात आले. यामध्ये पावसाळ्यात खड्डे पडण्याची दाट शक्यता असलेल्या ११० रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी त्यांचे प्राधान्यक्रम एक ठरवण्यात आला.
पावसाळ्यात काही दिवस तग धरू शकणाऱ्या २४८ रस्त्यांना प्राधान्यक्रम २ मध्ये टाकण्यात आले. मात्र, ३१ मार्च रोजी हरित लवादाने प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या दगडखाणींवर बंदी आणल्यामुळे रस्त्यांची कामे ठप्प झाली, तरीही ३१ मे या डेडलाइनपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता.
परंतु कामे काही पूर्ण होण्याचे लक्षण नसल्याने प्रशासनाने डेडलाइन ३ जूनपर्यंत वाढवली. मात्र, ही मुदत शनिवारी संपत असताना, अडीचशे रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात होईपर्यंत ही कामे पूर्ण करून घेण्याची ताकीद ठेकेदारांना देण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता, ठेकेदारांना या विलंबाचे प्रत्येक दिवसाचे पाच हजार रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता असल्याने या रस्त्यांची कामे त्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार आणि पालिकेसमोर आहे.

विभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी
तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांची यादी देण्यास आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार, विभाग अधिकाऱ्यांनी यादी तयार केली असल्याने, ही कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ठेकेदारांएवढीच अधिकाऱ्याचीही आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची ताकीद विभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिली आहे. यासाठी अधिकाऱ्यांकडून शपथपत्र मागविण्यात आले आहे, तसेच अर्धवट राहिलेल्या कामांचा जाबही अधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
नवी मुंबईतील काही दगडखाणीतून मुंबईला खडीचा पुरवठा होत आहे. या खडीचा पुरवठाच बंद झाल्याने मुंबईतील रस्त्यांची कामे ठप्प झाली. सरकार दरबारी मिनतवारी, जिल्हाधिकाऱ्यांची मनधरणी करूनही खाडीचा प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे आपल्या बचावासाठी अधिकाऱ्यांना आता खडीचे कारण पुढे केले आहे. दगडखाणी बंद झाल्यामुळे ४० दिवस खडीचा पुरवठा झाला नव्हता, असा युक्तिवाद अधिकारी करत आहेत.

खड्ड्यांसाठी परदेशी तंत्र
खड्डे भरण्यासाठी या वर्षी पुन्हा परदेशी प्रयोग
करण्यात येणार आहे. यासाठी आॅस्ट्रिया आणि इस्रायलवरून खड्डे भरण्याचे साहित्य पालिकेने मागविले आहे. खड्डे भरण्यासाठी गेल्या वर्षी अनेक प्रयोग केल्यानंतर या दोन देशांतील तंत्र वापरण्याचा निर्णय पालिकेने घेतले. त्यानुसार, ३८ टन माल मागविण्यात आला असून, यावर ७० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.

रस्ते कामाची आकडेवारी
प्रकार एकूण काम अर्धवट
रस्ते झालेले काम
प्राधान्य १ ११० १०३ ७
प्राधान्य २ २४८ ८० १६८
प्रकल्प रस्ते ४१५ ३२३ ९२

Web Title: Five thousand penalties for contractors everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.