फेरीवाल्यांना पाच हजारांचा दंड ?

By admin | Published: March 16, 2015 11:02 PM2015-03-16T23:02:58+5:302015-03-16T23:02:58+5:30

रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि मंडया या भागांत १५० मीटरपर्यंतच्या अंतरावर त्यांना प्रतिबंध घालण्यात येणार आहे.

Five thousand penalty for hawkers? | फेरीवाल्यांना पाच हजारांचा दंड ?

फेरीवाल्यांना पाच हजारांचा दंड ?

Next

ठाणे : महापालिका हद्दीत आता फेरीवाला धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि मंडया या भागांत १५० मीटरपर्यंतच्या अंतरावर त्यांना प्रतिबंध घालण्यात येणार आहे. त्यानंतर, अशा ठिकाणी ते व्यवसाय करताना आढळल्यास त्यांच्या जप्त केलेल्या मालावर रिमूव्हल चार्जेसबरोबर त्याला ५ हजाराचा दंड करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. तसेच अनधिकृत बांधकामांवर तोडकाम कारवाईच्या खर्चातही वाढ पालिकेने प्रस्तावित केली आहे.
अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करताना त्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करणे तसेच त्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून त्यांनाही दंड केला जाणार आहे. त्यानुसार आता भाजी, फळे, मासळी आदी शिवणयंत्र, लॉकर्सयंत्र, लाकडी बाकडी, फोल्डिंग स्टॉल्सवर कारवाईचे दर दुप्पट आकारले जाणार आहेत.
यानुसार, १ ते २५ किलोपर्यंत पूर्वी १२५ रुपये आकारले जात होते. ते आता २५० तर २५ ते ५० किलोला आता २५० ऐवजी ५०० रुपये आकारले जातील. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना येणाऱ्या खर्चात वाढ करताना त्या ठिकाणी जप्त करण्यात येत असलेल्या इतर मटेरिअलच्या दरातही वाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार, बिल्डिंग मटेरियलच्या दंडाचे दरही दुप्पट प्रस्तावित केले आहेत. तसेच हातगाडीवाल्यांवर कारवाईचे दर आता ९०० रुपयांवरून १८०० रुपये प्रस्तावित केले आहेत.
याशिवाय, तात्पुरती ताबापावती वसुलीच्या रकमेतही वाढ प्रस्तावित करून ती ३० ऐवजी ६० रुपये करण्यात येणार आहे. वाहने उचलणे व टोविंग चार्जेसही दुप्पट करण्यात येणार आहेत.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि मंडयांच्या १५० मीटरच्या परिसरात फेरीवाले आढळल्यास त्यांच्याकडील जप्त केलेल्या मालावर रिमूव्हल चार्जेसशिवाय ५००० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे आता ठाणे स्टेशन परिसर हा यानिमित्ताने का होईना परंतु फेरीवालामुक्त होऊ शकतो. यासंदर्भातील प्रस्ताव २० तारखेला होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला असून याला मंजुरी मिळाल्यास त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

४मालमत्ता, पाणीआकार आदी करांमध्ये वाढ प्रस्तावित केल्यानंतर ठाणे महापालिकेने आता रस्ता खोदाई फीमध्ये वाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार, प्रति रनिंग मीटरमध्ये ५०० ते ३ हजारांपर्यंतची वाढ प्रस्तावित आहे.
४मलनि:सारण जोडणी शुल्कातही वाढ प्रस्तावित केली आहे. ठाणे महापालिकेमार्फत विविध सेवा संस्थांना केबलसाठी आकारण्यात येणाऱ्या रस्ता खोदाई फी दराकरिता यापूर्वी महासभेने ठराव मंजूर केला आहे.
४आता पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नवे दर प्रस्तावित केले असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजूरीसाठी पटलावर ठेवला आहे.

प्रति रनिंग मी. अन् प्रति कनेक्शनने दर आकारणी
४महापालिकेने यंदाच्या मूळ अंदाजपत्रकात रस्ता खोदाई फीपोटी ४० कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. त्यानुसार, रस्त्याखालून भुयारी मार्गाने ड्रिलिंग करण्यासाठी यापूर्वी १५०० रुपये आकारले जात होते. आता तेच दर प्रति रनिंग मीटर हे २००० रुपये आकारण्याचे प्रस्तावित केले आहे.
४ग्राउंटिंग केलेला रस्ता खोदण्यासाठी आता ३००० प्रति चौरस मीटरऐवजी ३९००, कच्चा रस्ता १५०० ऐवजी २०००, डब्ल्यूबीएम रस्ता २५०० ऐवजी ३३००, काँक्रीट रस्ता ९००० ऐवजी ११७००, डांबरी रस्ता ७३५० ऐवजी ९६००, काँक्रीट पदपथ ४२०० ऐवजी ५५००, फ्लायओव्हर १००००० ऐवजी १३००००, सब वे ६००००० ऐवजी ७८००००, कल्व्हर्ट ४४००० ऐवजी ५७२०० आकारले जाणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी मायक्रोट्रेचिंगनुसार ७२ रुपये प्रति मीटर दर आकारले जात होते. ते आता बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
४दुसरीकडे ड्रेनेजजोडणी आकार व रस्ता फोड फीमध्ये मागील १२ वर्षांपासून कोणतीही वाढ केली नव्हती़ परंतु, या कालावधीत बांधकाम खर्च व आस्थापना खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यातही वाढ प्रस्तावित केली असून यानुसार त्याचे दर ५०० ऐवजी २००० प्रति कनेक्शन आकारले जाणार आहेत.

Web Title: Five thousand penalty for hawkers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.