राज्यातील पाच हजार विद्यार्थी कला गुणांपासून वंचित!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 07:09 AM2019-06-10T07:09:01+5:302019-06-10T07:09:27+5:30
१०५ शाळांच्या हलगर्जीचा परिणाम : शिक्षण मंडळाकडे वेळेत गुण पाठविले नाहीत
विजय मांडे
कर्जत : गेल्या १३ वर्षांच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरल्याने विद्यार्थी आणि शिक्षक चिंतेत असतानाच, राज्यातील तब्बल पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कला गुणांपासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती निकालानंतर समोर आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे.
क्रीडा, चित्रकला आणि संगीत विषयांत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेकडून कला गुण दिले जातात. दहावीच्या निकालावेळी हे गुण ग्राह धरले जातात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो. मात्र, यंदा राज्यातील १०५ माध्यमिक शाळांनी हे गुण राज्य माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळाकडे वेळेत पाठविले नसल्याने मंडळाने त्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यास नकार दिला. त्यामुळे सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
शाळांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले कला गुण शिक्षण मंडळाकडे पाठविण्यासाठी वेळ निश्चित करून दिली जाते. या वर्षी २८ जानेवारीपर्यंत हे गुण पाठविण्याचे निर्देश शिक्षण मंडळाने दिले होते. मात्र काही शाळांचे गुण पोहोचले नसल्याने २ फेब्रुवारी आणि नंतर ५ फेब्रुवारी अशी दोन वेळा मुदतवाढ दिली. तरीही राज्यातील सर्व ९ विभागांतील तब्बल १०५ शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण निर्धारित वेळेत शिक्षण मंडळाकडे पाठविले नाहीत.
दरम्यान, या १०५ शाळांनी ७ ते २० फेब्रुवारीदरम्यान कलागुण शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पोहोचविले. त्या वेळी त्या-त्या बोर्डाच्या कार्यालयातील प्रमुखांनी राज्य शिक्षण विभाग किंवा राज्य शासनाचे आदेश असतील, तरच आम्ही वाढीव गुण देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर उशिरा गुण पाठविणाºया माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक आणि संस्था प्रमुखांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणताही शासन निर्णय घेऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
शिक्षणमंत्र्यांनी शब्द पाळला नाही!
च्आचारसंहिता संपल्यानंतर २ मे रोजी कला गुण वेळेत न पोहोचविलेल्या शाळांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्या वेळी संबंधित १०५ शाळांतील विद्यार्थ्यांचे कला गुण तपासणीसाठी त्या-त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवून देण्याचे आदेश दिले होते.
च्तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी परीक्षा मंडळाने या १०५ शाळांतील पाच हजार विद्यार्थ्यांना कला गुण दिले नसल्याचे जाहीर केले.
च्त्यामुळे एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्याची भूमिका घेतली असताना शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना कला गुण न दिल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘मार्कशिट’मध्ये गुण वाढवून येतील?
कर्जत येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या ५६ विद्यार्थ्यांचे कला गुण शिक्षण मंडळाकडे पोहोचण्यास उशीर झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी उपोषण केले होते. त्या वेळी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, आॅनलाइन निकालात कला गुण दिसत नसले तरी गुणपत्रिकेत (मार्कशिट) हे गुण समाविष्ट केले जातील, असा आशावाद या संस्थेचे सचिव प्रवीण गांगल यांनी व्यक्त केला.