कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईला आणला जात असलेला पाच टन भेसळयुक्त मावा अन्न प्रशासन विभागाने जप्त केला आहे. निकृष्ट दर्जाचा खवा, चीक दूध, चिकीकेक व अन्य दुग्धजन्य पदार्थांची दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात मुंबईला विक्रीसाठी ट्रॅव्हल्स बसमधून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न प्रशासन विभागाने ही कारवाई केली.
चारोटी टोलनाक्यावर रात्री १२ वाजता अन्न प्रशासन विभागाने ट्रॅव्हल्सला अडवून त्यांची चौकशी केली असता २० ते २५ ट्रॅव्हल्स बसमध्ये निकृष्ट दर्जाचा खवा आढळून आला आहे. हा माल राजस्थान आणि गुजरातवरून मुंबईच्या दिशेला मोठमोठ्या हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांमध्ये पाठविण्यात येणार होता. यात चार ते पाच टन एवढा खवा जप्त करण्यात आला आहे. हा निकृष्ट दर्जाचा माल दिवाळीनिमित्त बाजारात येत असून यापासून तयार होणारी मिठाई लोकांच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे सांगण्यात आले.
राजस्थान येथून निकृष्ट खवा अयोग्य पद्धतीने निकृष्ट डब्यांमध्ये पॅक करून मुंबईमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग व मनसे कार्यकर्त्यांना मिळाली. यावरून मध्यरात्रीनंतर १२ वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाने चारोटी टोलनाका येथे ट्रॅव्हल्स बसची चौकशी केली असता परराज्यांंतून आलेला सुमारे चार ते पाच टन खवा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत साधारणत: १४ लाखांच्या आसपास आहे. त्यानंतर या खव्याचा नमुना घेण्यात आला आहे.
मिठाईसाठी मागवला होता खवा
बोरीवली, वसई, पेल्हार येथील स्वीट मार्ट, हॉटेल्स व्यावसायिकांकडून पेढा व इतर मिठाई तयार करण्यासाठी मागविण्यात आला होता. हा खवा प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करत असून सदर आरोपींची चौकशी केली जात असून कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे अन्न प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.