Join us  

मिठी नदीतून दररोज पाच टन तरंगणारा कचरा काढला जाणार, प्रकल्पाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 10:15 AM

Mumbai News: मुंबई शहर आणि उपनगरातून वाहणाऱ्या मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मिठी नदीतून काढलेल्या कचऱ्यासह त्यावर प्रक्रिया करणे आणि मिठी नदी स्वच्छ ठेवण्यावर अधिकाधिक भर दिला जाणार आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातून वाहणाऱ्या मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मिठी नदीतून काढलेल्या कचऱ्यासह त्यावर प्रक्रिया करणे आणि मिठी नदी स्वच्छ ठेवण्यावर अधिकाधिक भर दिला जाणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी बीकेसी मिठी नदी येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले असून, आता मिठी नदीच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे.मिठी नदीमधील तरंगता कचरा गोळा करून त्याचे पृथ्थकरण पुढील तीन महिन्यांसाठी केले जाईल. गोळा केलेला कचरा वेगळा केला जाईल. त्याचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण केले जाईल. वेगळा केलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जाईल. नदी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेसह कंपन्यांचे उत्पादन विल्हेवाट साहित्य, पॅकेजिंग साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपयोग केला जाईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. शिवाय जैवविविधतेलाही हानी पोहोचणार नाही.मिठी प्रकल्पातून धारावीमधील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प सौरऊर्जेद्वारे चार्ज केलेल्या बॅटरीच्या बॅकअपद्वारे होईल. तीन पाळ्यांत हे काम केले जाईल. एकाच ठिकाणाहून दररोज सुमारे पाच टन तरंगता कचरा संकलित केला जाईल. टप्प्याटप्प्याने ही क्षमता दिवसाला ५० टन प्रतिदिन वाढविण्याचे लक्ष्य आहे.मुंबई महापालिकेच्या मदतीने प्राधिकरण सांडपाण्यावर उपचार करण्यासाठी, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारून नदीत विरघळलेला ऑक्सिजन वाढविण्यासाठी आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी कमी करण्यासाठी कार्य करण्यात येईल. त्यामुळे जल वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनाला मदत होईल. जागरुकता कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत मिठी नदीकाठी कुर्ला, सायन आणि धारावीमधील लोकांना सेंद्रिय कचरा प्रक्रिया, कंपोस्ट बनविणे, कोरडा कचरा गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधतेला हानी पोहोचणार नाही. प्रकल्पात माहिती मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. प्रकल्पाचा कालावधी अठरा महिने आहे. यासाठी पाचशे कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर केला जाईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.

टॅग्स :मुंबई