लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करत असताना आणि निवृत्त झाल्यावरही स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत घरीच दवाखाना थाटणाऱ्या पांडुरंग घोलप या बोगस डॉक्टरचा टोकावडे पोलिसांनी पर्दाफाश केला आहेे. त्याने चुकीच्या उपचारांतून पाच निष्पापांचे बळी घेतले असून या बोगस डॉक्टरविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला गुरुवारी दुपारी अटक केली.
धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे घोलप शिपाई म्हणून कार्यरत होता. घोलप सेवेत असतानाही त्याने घरीच दवाखाना थाटला होता. तो स्वत:ला डाॅक्टर म्हणून घेत गोरगरिबांवर उपचार करीत असे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्याने घरातून उपचार सुरू ठेवले होते. परिसरातील अनेक जण या बोगस डाॅक्टरवर विश्वास ठेवून त्याच्याकडून उपचार करून घेत. २४ व २६ जानेवारी रोजी धसई येथील बारकूबाई वाघ, चिखलीवाडी (धसई) येथील आशा नाईक या आदिवासी महिलांवर घोलप याने चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच राम भिवा आसवले (रा.मिल्हे), आलका मुकणे (रा.मिल्हे), लक्ष्मण मोरे (रा.पळू), यांच्यावरही चुकीचे उपचार झाल्याने तिघांचा मृत्यू झाला.
अन्य रुग्णांचीही केली जात आहे चौकशी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन घाग यांनी दिली. दोन दिवसांपासून फरार असलेल्या घोलपला गुरुवारी अटक केली. तर या बोगस डाॅक्टरने उपचार केलेल्या अन्य रुग्णांची चौकशी सुरू असल्याचे तालुका आरोग्य विभागाने सांगितले.