मुंबई : चोरी करण्यासाठी घराच्या छपरावर चढलेल्या चोरट्याचा ‘हाय व्होल्टेज’ तारेला स्पर्श झाल्याने चोरट्यासह घरातील पाच जण भाजल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री वडाळा येथे घडली. जखमींमध्ये एका महिलेसह एका १० वर्षांच्या चिमुरडीचादेखील समावेश आहे. यामध्ये चोरटा ७० टक्के भाजल्याने त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडाळ्यातील गणेशनगर परिसरात रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इजाज अन्सारी (१९) हा चोरटा चोरीच्या उद्देशाने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह सुनील थळे (४२) यांच्या घराच्या छतावर चढला होता. मात्र पत्र्यावर आवाज झाल्याने घरातील थळे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढण्याच्या प्रयत्न केला. यादरम्यान यातील इजाजचा तोल गेल्याने तो छपरावरून खाली कोसळणार असल्याने त्याने स्वत:ला सावरण्यासाठी हात वर केले. यादरम्यान घरावरून जाणाऱ्या ‘हाय व्होल्टेज’ तारेच्या संपर्कात आल्याने मोठा स्फोट झाला. त्यानंतर थळे कुटुंबीयांच्या घराचे छत कोसळले. त्यामुळे या घटनेत इजाजसह थळे कुटुंबीयातील शर्मिला थळे (३२), श्रावणी थळे (१०) आणि प्रवीण वेटकुली (३०) हे चार जण जखमी झाले. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने रहिवाशांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत जखमींना केईएम रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी इजाज हा ७० टक्के भाजला आहे. तर इतर किरकोळ भाजले असून, त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत वडाळा पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने पाच जखमी
By admin | Published: April 25, 2017 1:52 AM