Join us

पंचवार्षिक डॉक्युमेंटा कलाप्रदर्शन अडचणीत; 5 जणांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:13 PM

समीक्षक रणजीत होस्कोटे यांच्यासह पाच जणांचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्यू-पॅलेस्टिनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर २०१९ साली एका चर्चासत्राच्या आयोजना वरून घेतलेल्या भूमिकेची झळ बसून प्रसिद्ध भारतीय कवी व कला समीक्षक रणजित होस्कोटे यांना जर्मनीत भरणाऱ्या प्रतिष्ठित ‘डॉक्युमेंटा’ या कलाप्रदर्शनाच्या निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.होस्कोटे यांनी चार वर्षांपूर्वी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे, हे विशेष. दरम्यान सहा जणांच्या निवड समितीवरील एक इस्रायली कला समीक्षक ब्रॅचा एटिंगर यांनी होस्केटे यांच्या आधी इस्रायलला ‘काळ्या छाये’ने प्रभावित केल्याचे स्पष्ट करत राजीनामा दिला होता. होस्कोटे यांनी १२ नोव्हेंबरला राजीनामा दिल्यानंतर ‘शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअल आर्ट’चे गाँग यान, पॅरिसमधील लेखक आणि समीक्षक सायमन नजामी, व्हिएन्नातील समीक्षक कॅथरिन रोमबर्ग आणि कोलंबियातील मारिया इनेस या उर्वरित चार सदस्यांनीही राजीनामे दिल्याने या प्रतिष्ठित प्रदर्शनाच्या आयोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

२०१९ साली भारतातील ‘बीडीएस’ने काढलेल्या एका पत्रावर होस्कोटे यांनी स्वाक्षरी केली होती. इस्रायलच्या कौन्सुलेट जनरलने मुंबईत ‘यहुदी आणि हिंदुत्व’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या निषेधार्ह हे पत्रक काढण्यात आले होते. त्यावेळी होस्कोटे यांनी घेतलेल्या भूमिकेचा लेखात उल्लेख करून त्यांना सध्याच्या इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य करण्यात आले आहे.

ते पटले नाही!‘राजकीय झिओनिझमची सर्वप्रथम मांडणी करणारे विचारवंत थिओडर हर्झल यांच्या ज्यू धर्माविषयीच्या मांडणीचा विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या मांडणीशी संबंध जोडण्याचा तो चुकीचा प्रयत्न होता. तो न पटल्याने या चर्चासत्राला विरोध करणाऱ्या पत्रावर आपण त्यावेळी स्वाक्षरी केली होती,’ असे स्पष्टीकरण होस्कोटे यांनी दिले आहे.

डॉक्युमेंटाविषयी... पाच वर्षांनी एकदा जर्मनीतील कॅसल शहरात आयोजित करण्यात येणारे हे प्रदर्शन १०० दिवस चालते. यावेळी हे प्रदर्शन २०२७ साली भरणार आहे. कलाकार, समीक्षक, कला इतिहासकार यांच्यात या प्रदर्शनाला मानाचे स्थान आहे. हे प्रदर्शन तुलनेत कमी व्यावसायिक आणि बाजारकेंद्री आहे. संपूर्ण निवड समितीनेच राजीनामे दिल्याने या प्रदर्शनाचे आयोजन लांबणार आहे.

‘बीडीएस’ काय आहे?ही एक आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. पॅलेस्टिनींच्या बाजूने इस्रायलवर राजकीय व आर्थिक दबाव आणणे हा या संघटनेचा उद्देश आहे.

टॅग्स :मुंबई