पाच उन्हाळे-पावसाळे सरले, तरी आमची भरती काही होईना; प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी उद्विग्न

By दीपक भातुसे | Published: March 10, 2024 07:57 AM2024-03-10T07:57:50+5:302024-03-10T07:59:16+5:30

जिल्हा परिषद भरती, अनेकांचे वय गेले निघून

five years passed but our recruitment was nothing students are agitated due to stalling of the process | पाच उन्हाळे-पावसाळे सरले, तरी आमची भरती काही होईना; प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी उद्विग्न

पाच उन्हाळे-पावसाळे सरले, तरी आमची भरती काही होईना; प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी उद्विग्न

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद भरतीला मागील पाच वर्षांपासून ग्रहण लागले आहे. ही भरती दीर्घकाळ रखडल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्येत गेले आहेत. अनेकांचे शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याने त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्नही भंगले आहेच, शिवाय या भरतीसाठी तयारी करण्यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. शासन आमची आणखी किती परीक्षा बघणार, ही भरती कधी पूर्ण करणार, असा उद्विग्न सवाल हे विद्यार्थी करत आहेत.

शुल्कही गेले

- २०१९ साली जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ पदांची भरती जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने या भरतीसाठी अर्ज आणि शुल्क भरले. 
- मात्र २०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे २०२३ पर्यंत भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि पुढे ही भरतीच रद्द करण्यात आली. 
- स्वप्न तर भंगलेच पण भरतीसाठी दिलेले शुल्कही शासनाने परत दिले नाही.

परीक्षा केव्हा?

जिल्हा परिषदेच्या १९,४६० पदांच्या भरतीत आरोग्य सेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वांत जास्त पदे आहेत. ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीनंतर सर्वांत जास्त अर्ज आले. पण अद्याप या पदांसाठी परीक्षाच झालेली नाही.

उत्तीर्णांना अद्याप नियुक्ती नाही

ऑगस्ट २०२३ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमध्ये ‘क’ वर्गातील १९,४६० पदे सरळ सेवेने भरती करण्याची जाहीरात निघाली. जिल्हा स्तरावर काही पदांची परीक्षा झाली. जानेवारी २०२४ मध्ये निकालही लागले, कागदपत्रांची छाननीही झाली. मात्र, अद्याप नियुक्ती दिलेली नाही.

२०१९ पासून रखडलेली भरती शासनाला घेता येत नाही. आता निवडणुकांची आचारसंहिता, त्यामुळे ही भरती आणखी रखडेल. या काळात वय निघून चालले. आमची मेहनत आणि पैसाही यामुळे वाया जात आहे. ५ उन्हाळे, ५ पावसाळे, ५ हिवाळे एका भरतीने पाहिले अजून काय शोकांतिका असेल यापेक्षा... - एक विद्यार्थी
 

Web Title: five years passed but our recruitment was nothing students are agitated due to stalling of the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी