रेल्वे तिकीट केंद्राच्या आवारात दलालांचा सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:41 AM2019-05-06T06:41:56+5:302019-05-06T06:42:15+5:30
उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवासासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वे प्रवासात गर्दी वाढते.
मुंबई - उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवासासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वे प्रवासात गर्दी वाढते. यावर पर्याय म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून उन्हाळी विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांची प्रवाशांना माहिती नसल्याने दलाल या गाड्यांसाठी तिकीट बुक करतात आणि नंतर ते जादा पैसे घेऊन विकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रवासी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तिकीट आरक्षित करण्यासाठी जातात. त्या वेळी मेल, एक्स्प्रेसच्या सीट आधीच आरक्षित असल्याचे सांगण्यात येते. त्या वेळी प्रवाशांना तिकीट काढून देण्यासाठी आणि तिकीट आरक्षित करण्यासाठी दलाल पुढाकार घेतात आणि प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट रक्कम वसूल करतात.
दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत दलालांना पकडण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. यासह दलालांना पकडण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.