लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी अवैध पार्किंग आणि डबल पार्किंगपासून लोकांना होणारा त्रास आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा लवकरच निघेल, असे आश्वासन मुंबईचे वाहतूक पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी, आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.वरळी येथील वाहतूक पोलिसांचे मुख्यालयात झालेल्या या बैठकीत मंगल प्रभात लोढा यांच्यासह शिष्टमंडळाने अमितेश कुमार यांना याबाबत निवेदन दिले. दक्षिण मुंबईतील गिरगाव, गायवाडी, वाळकेश्वर, मलबार हिल, प्रियदर्शिनी पार्कसह भुलाभाई देसाई रोड, ब्रीच कँडी येथील अनधिकृत पार्किंगचा विषय सोडविण्याबाबत चर्चा केली. सदर परिसरात बस, पाण्याचे टँकर आणि टुरिस्ट वाहनांची पार्किंग केली जाते, याचा स्थानिकांसह पादचारी वर्गाला त्रास होतो. याबाबत वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कार्यवाही केली जात नाही, असे लोढा यांनी या वेळी कुमार यांच्या निदर्शनास आणून दिले.कुमार यांनी यावर दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, शिवाय अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाईल. दरम्यान, शिष्टमंडळामध्ये वाळकेश्वरच्या नगरसेविका ज्योत्स्नाबेन महेता, मंडल महिला भाजपाच्या अध्यक्ष श्वेता मांजरेकर यांचा समावेश होता.
दक्षिण मुंबईतील वाहतूक समस्येवर लवकरच तोडगा
By admin | Published: May 23, 2017 2:24 AM