Join us

...तर अपक्षाचा झेंडा हाती!

By admin | Published: April 04, 2015 5:36 AM

नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून नामांकन अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर इच्छुकांच्या

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून नामांकन अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर इच्छुकांच्या उड्या पडत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपात सर्वाधिक इच्छुक असून आतापर्यंत दीड हजाराहून अधिक अर्जांची विक्री झाली असून यात एकेका इच्छुकाने खबरदारीची उपाययोजना म्हणून चार ते पाच अर्ज घेतले आहेत. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर यातील अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी ऐनवेळी काँगे्रस, रिपाइं आणि शेकाप किंवा अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे.या बंडाबाबत काहींना छेडले असता त्यांनी सांगितले की, स्थानिक श्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही गेल्या चार-पाच महिन्यांत विविध कार्यक्रमांद्वारे लाखो रुपये खर्चून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. यात विविध स्पर्धा, महिला मेळावे, स्नेहसंमेलने, सहली, यात्रौत्सवांचा समावेश आहे. यात प्रत्येकाची चार ते पाच लाखांवर रक्कम खर्च झाली आहे. असे असतानाही पक्ष तर ऐनवेळी दुसऱ्या तिसऱ्यास किंवा विद्यमान नगरसेवकांच्या घरातील व्यक्तींना तसेच आयारामांना तीन ते चार चार तिकिटे देत असेल तर आम्ही काय फक्त पक्षांचे बॅनर आणि झेंडेच लावायचे काय, असा सवाल केला आहे. काही ठिकाणी अनेकांचे प्रभाग गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच खुले झाले आहेत. स्व-पक्षातील इतर वॉर्डातील इच्छुकांना तिकीट देण्याचे संकेत मिळाल्याने त्यांनी बंडखोरीची तयारी चालविली आहे.तिकीट मिळाले तर ठीक नाही तर अपक्ष हे सूत्र प्रमुख पक्षांतील कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचे दिसत आहे. यामुळेच संभाव्य धोका टाळण्यासाठी तीन ते चार नामांकन अर्ज विकत घेतल्याचे काही इच्छुकांनी सांगितले. यात त्यांनी एका अर्जावर स्वपक्षाचे तर दुसऱ्या अर्जावर पक्षाचा रकाना याठिकाणी कोरी जागा सोडून ऐनवेळी अपक्ष किंवा अन्य पक्षांचे नाव टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे.(खास प्रतिनिधी)