Join us

विधान भवन परिसरात झेंडे, पोस्टर आणि कडक तपासणी; सुरक्षा छावणीत रूपांतर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 8:58 AM

विशेष अधिवेशनामुळे मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या दक्षिण मुंबईत तैनात करण्यात आल्या होत्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे अनेक पोस्टर्स परिसरात झळकत होते

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आणि शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनामुळे दक्षिण मुंबईला अक्षरश: लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  विधान भवन परिसरात तर तपासणीशिवाय पुढे सरकणेही अवघड बनल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. जोडीलाच जागोजागी नव्या सरकारच्या अभिनंदनाचे पोस्टर्स आणि झेंड्यांचा भडिमार करण्यात आला होता. 

विशेष अधिवेशनामुळे मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या दक्षिण मुंबईत तैनात करण्यात आल्या होत्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे अनेक पोस्टर्स परिसरात झळकत होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. विधान भवनाच्या प्रत्येक प्रवेशद्वारातून आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यावरच संबंधितांना प्रवेश देण्यात येत होता. एरवी, सुरक्षाव्यवस्थेबाबत हळव्या असणाऱ्या विधान भवनातील मंडळींनाही या अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्थेचा अचंबा वाटावा, अशी स्थिती होती. 

शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. त्यानंतर रविवार आणि सोमवारी विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नक्की करण्यात आला. त्यामुळे २० जूनच्या रात्रीपासून बाहेर पडलेले शिंदे समर्थक आमदारही मुंबईत दाखल झाले होते. या अधिवेशनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण विधान भवनाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिंदे गटाचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये उतरले होते. त्यामुळे या हॉटेलपासून विधान भवनाच्या संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप झाले होते. विधान भवनाच्या परिसरात अनेक खासगी वाहनांना प्रवेश नाकारण्यात येत होता. मंत्रालयापासून पोलिसांनी खासगी गाड्यांची तपासणी केली.

अभिनंदनासाठी मोठी बॅनरबाजीया संपूर्ण परिसरात भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शिंदे सरकारच्या अभिनंदनासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती. याशिवाय भगवे झेंडे लावून शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. दरम्यान, विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजप कार्यालयाजवळ विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा विजय साजरा करणारे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाल्याने तिथेही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :एकनाथ शिंदेभाजपादेवेंद्र फडणवीस