फ्लेमिंगोने ट्रान्स हार्बर लिंकमुळे घर बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:50 AM2018-12-05T00:50:44+5:302018-12-05T00:50:49+5:30
शिवडी येथे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी-न्हावाशेवा) प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प २२ किलोमीटर लांबीचा आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : शिवडी येथे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी-न्हावाशेवा) प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प २२ किलोमीटर लांबीचा आहे. शिवडी येथील तिवरांच्या प्रदेशात हे काम सुरू असून येथील शेकडो तिवरांची झाडे तोडण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदेशी पक्षी शिवडीतील तिवरांच्या क्षेत्रात येतात. परंतु शिवडीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे फ्लेमिंगो (रोहित पक्षी) पक्ष्यांचे वास्तव्य येथून ठाणे खाडी, पाम बीच आणि ऐरोलीच्या खाडीत होत असल्याचे पक्षीतज्ज्ञांनी सांगितले.
समुद्री जीव अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितले की, सध्या प्लेमिंगो पक्षी शिवडी खाडीवरून उडताना दिसतात. परंतु ते शिवडीत एका जागी स्थायिक होत नाहीत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पातील ३०० मीटरपर्यंतचा पूल खाडीमध्ये बांधून तयार झाला आहे. फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात खाद्य आणि शांतता क्षेत्रात वास्तव्य करतात. शिवडीतील प्रकल्पामुळे येथील बऱ्याचशा तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पुरेसे खाद्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे कदाचित येथे फ्लेमिंगो स्थायिक होत नाहीत.
पक्षिमित्र सुनीश कुंजू यांनी सांगितले, ऐरोलीच्या खाडीत सध्या हजारोंच्या संख्येने प्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात. कारण तेथील वातावरण फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी पोषक आहे. परंतु नागरिकांनीही दक्षता घेतली पाहिजे. खाडी क्षेत्रात निर्माल्य टाकण्यास बंद केले पाहिजे. निर्माल्यात काही अंशी प्लॅस्टिकचे प्रमाण असते. हे प्लॅस्टिक फ्लेमिंगो पक्ष्यांच्या शरीरात गेल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
>ऐरोली फ्लेमिंगो अभयारण्याला महिन्याभरात एक हजार ते पंधराशे पर्यटक भेट देतात. पर्यटकांसाठी बोटिंगचीही सुविधा सुरू असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बोटिंग सेवा हाउसफुल्ल आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांना मान्सूनचे वातावरण पोषक नसल्याने ते स्थलांतरित होतात. हिवाळा सुरू झाल्यावर पुन्हा ते येतात. ऐरोली खाडीमध्ये नील हरित शेवाळाचे प्रमाण चांगले असून ते त्यांचे आवडते खाद्य आहे.
- एम. एस. बोठे,
वन परिक्षेत्र अधिकारी, फ्लेमिंगो अभयारण्य आणि किनारी व सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली
>तोपर्यंत ‘फ्लेमिंगो फेस्ट’ होणार नाही
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे संचालक दीपक आपटे म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘फ्लेमिंगो फेस्ट’ होणार नाही. प्रकल्पाचे काम सुरू आहे, तोवर फ्लेमिंगो पक्षी शिवडी खाडीत येणार नाहीत. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फ्लेमिंगो पक्षी येण्याची आशा आहे. त्यावर बीएनएचएसचा अभ्यास सुरू आहे.
>फ्लेमिंगो पक्ष्यांचे प्रकार
देशात यांच्या ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो अशा दोन प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात लेसर फ्लेमिंगो हे जास्त संख्येने येतात. हे तुलनेने छोट्या आकाराचे गर्द चोचीचे व लाल डोळ्यांचे असतात. त्यांची मान ‘एस’ आकारात दुमडलेली असते. उथळ पाण्यातील पक्ष्यांमध्ये याची गणना होते.