करावे येथील खाडीकिनारी फ्लेमिंगो अभयारण्य
By Admin | Published: January 4, 2016 02:10 AM2016-01-04T02:10:04+5:302016-01-04T02:10:04+5:30
पामबीच रोडवरील एनआरआय कॉम्प्लेक्स ते टी. एस. चाणक्य संस्थेच्या मागील खाडीकिनारा हा फ्लेमिंगोंचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जात आहे.
प्राची सोनवणे, नवी मुंबई
पामबीच रोडवरील एनआरआय कॉम्प्लेक्स ते टी. एस. चाणक्य संस्थेच्या मागील खाडीकिनारा हा फ्लेमिंगोंचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जात आहे. प्रत्येक वर्षी ४० हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो आश्रयासाठी येत असतात. पर्यटनाला चालना मिळावी व गुजरातवरून येणाऱ्या या पाहुण्या पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने हा परिसर अभयआरण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वन्यजीव मंडळाच्या दहाव्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नवी मुंबई, उरण व पनवेल परिसराला जवळपास १५० किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे. पूर्वी उरण परिसरात हिवाळा सुरू झाला की फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात वास्तव्याला येत असत. जवळपास तीन ते चार महिने पक्षी या परिसरात वास्तव्य करीत. पुढे उरणप्रमाणे पामबीच रोडवरील एनआरआय संकुलाच्या मागील बाजूला व टी. एस. चाणक्यच्या मागील खाडीमध्ये फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येऊ लागले. उंच पायाच्या, गडद गुलाबी रंग असलेल्या पंखांच्या फ्लेमिंगोंमुळे शहराच्या वैभवात भर पडली होती. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमी पहाटेपासून सायंकाळपर्यंत या परिसरात हजेरी लाऊ लागले. हौशी व व्यवसायिक छायाचित्रकारही फ्लेमिंगोंच्या हालचाली टिपण्यासाठी दिवसभर या परिसरात थांबू लागले. कच्छचे रण या परिसारत हे फ्लेमिंगो दलदलीच्या भागात मातीचे घरटे करून राहतात आणि या ठिकाणी त्यांचे प्रजनन होऊन हिवाळ््यात हे फ्लेमिंगो मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यप्राणी जीव मंडळाच्या बैठकीत अभयारण्याविषयीही निर्णय घेण्यात आला. ठाणे खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडणाऱ्या ऐरोली आणि वाशी या दोन खाडीपुलादरम्यानच्या हे अभयारण्य उभारले जाणार असून, हा इकोसेन्सिटिव्ह झोन असून याला शासनाने राखीव वनाचा दर्जादेखील दिला जाणार आहे. १९९४ पासून या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो स्थलांतर करीत असून नोव्हेंबर ते जून या कालावधीत हजारो फ्लेमिंगो या ठिकाणी पाहायला मिळतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचे हे डौलदार रुप पाहण्यासाठी नवी मुंबई परिसरातील पर्यटकांना संधी मिळणार असून, ‘लेझर फ्लेमिंगो’, ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ या प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात. अभयआरण्य घोषित केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे.