Join us

लॉकडाउनचा परिणाम; फ्लेमिंगोंचा मानवी वस्तीजवळ मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:44 AM

सुमारे १ लाख २५ हजार फ्लेमिंगो मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दाखल

- सचिन लुंगसे मुंबई : लॉकडाउनमुळे माणसाचा निसर्गातील हस्तक्षेप कमी झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूरात उजनी धरण क्षेत्रात फ्लेमिंगोचा (रोहित) अगदी मानवी वस्तीजवळ मुक्त संचार सुरू आहे. अलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदाच असे पाहिल्याचा दावा पक्षी अभ्यासकांनी केला आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पक्षी अभ्यासक राहुल खोत यांनी सांगितले की, आम्ही दरवर्षी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दाखल होत असलेल्या फ्लेमिंगोंचा अभ्यास करतो. गेल्या वर्षी येथे सुमारे १ लाख ३० हजार फ्लेमिंगो होते. लॉकडाउनमुळे आम्हाला यावर्षी अभ्यास करता आलेला नाही. यावर्षी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दाखल झालेले फ्लेमिंगो मागील संख्येएवढेच आहेत. लाकडाउनमुळे ते मनुष्यवस्तीजवळ आल्याचे निदर्शनास येत आहे. नवी मुंबईच्या व्हायरल व्हिडिओत फ्लेमिंगो किनारी आल्याचे दिसत आहे.भांडुप येथील पक्षी अभ्यासक सुनीश कुंजू यांनी सांगितले, भांडुप, महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि शिवडी येथे दाखल झालेल्या फ्लेमिंगोंचे प्रमाण दरवर्षीप्रमाणेच आहे. मात्र लॉकडाउनमुळे फ्लेमिंगो आता मनुष्य वस्तीजवळ आले आहेत. महाराष्ट्र निसर्ग उद्यानचे पक्षी अभ्यासक युवराज पाटील यांच्या म्हणण्यानुसार, धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पूर्वी फ्लेमिंगोंचे दर्शन होत नव्हते. मात्र आता येथे देखील फ्लेमिंगो पाहण्यास मिळत आहेत. कमी झालेली रहदारी, कमी झालेले प्रदूषण याचा काहीसा चांगला परिणाम झाला आहे.फ्लेमिंगो पक्षी समाजप्रिय आहेत. त्यांच्या वसाहतीत हजारो पक्षी असतात. या मोठ्या आकाराच्या वसाहतींमुळे त्यांचे भक्षकांपासून रक्षण, अन्नाचा पुरेपूर वापर आणि घरटी बांधण्यासाठी कमी उपलब्ध असलेल्या जागेचा कार्यक्षम वापर ही उद्दिष्टे साध्य होतात.विणीचा हंगाम सुरू होण्याआधी या वसाहतींमध्ये १५-५० पक्ष्यांचे लहानलहान गट तयार होतात. भारतात गुजरात राज्यातील कच्छच्या रणात विणीच्या हंगामात हे पक्षी मोठ्या संख्येने जमा होतात. सप्टेंबर ऑक्टोबरपासून ते मार्च-एप्रिल हा त्यांच्या विणीचा हंगाम असतो. चिखलाच्या लहानलहान गोळ्यांनी तयार केलेले त्यांचे घरटे वरच्या बाजूस खळगा असलेल्या शंकुच्या आकाराचे असते. दर खेपेला मादी घरट्यात एक निळसर रंगाचे अंडे घालते. जवळजवळ महिनाभर ते अंडे नर-मादी मिळून उबवितात. पिलांचा रंग भूरकट लाल असतो, अशी माहिती निसर्ग अभ्यासक कौस्तुभ दरवेस यांनी दिली.महाराष्ट्रात कोठे येतात?पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी आटते तेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात आणि देशात सर्वत्र पसरतात. मुंबईत सायनची खाडी, ऐरोली, नवी मुंबई परिसरात, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी परिसरात हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय हे या पक्ष्यांच्या अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.सहा प्रजाती : जगात सर्वत्र रोहित पक्ष्याच्या सहा प्रजाती आहेत. त्यांपैकी मोठा रोहित (फि. रोझियस), लहान रोहित (फि. मायनर) या दोन प्रजाती आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडात आढळत असून चिलियन रोहित (फि. चायलेन्सिस), प्यूना रोहित (फिनिकॉप्टेरस जेमेसी), अँडियन रोहित (फि. अँडिनस) व अमेरिकन रोहित (फि. रबर) या चार प्रजाती अमेरिकेत आढळतात. भारतात मोठा रोहित (फिनिकॉप्टेरस. रोझियस) आणि लहान रोहित (फि. मायनर) या दोन्हीही जाती आढळतात.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या