मुंबई : लेसर फ्लेमिंगोज, ग्रेटर फ्लेमिंगोज आणि इतर हजारो स्थानिय तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास म्हणून ठाणे खाडीची ओळख आहे. मात्र, ही ओळख आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची पाणथळ जागा म्हणून लौकिक मिळवणार आहे. कारण, मुंबईच्या किनारपट्टीवर वसलेली आणि अशियातील सर्वात मोठ्या खाड्यांपैकी एक असलेल्या ठाणे खाडीची रामसर कन्व्हेन्शनकडून मुंबई महानगर प्रदेशातील पहिली आणि महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ म्हणून तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह महानगराच्या जैवविविधतेच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. मात्र आता हे वैभव आपण जपले पाहिजे, असा सूरही पर्यावरण क्षेत्रातून उमटू लागला आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच सर्वाधिक मोठी पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित झाली आहे.
रामसर कन्व्हेन्शननुसार पाणथळ जागेची व्याख्या काय आहे ? दलदल, फेन, पीटलॅण्ड किंवा पाणी, नैसर्गिक किंवा कृत्रिम, कायमचे किंवा तात्पुरते, स्थिर किंवा वाहणारे, ताजे, खारे, समुद्राच्या पाण्याचे क्षेत्र ज्याची खोली ओहोटीच्या वेळेस सहा मीटरपेक्षा अधिक नसावी.
रामसर साईट म्हणजे काय ? कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्डस (रामसर, इराण १९७१) अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ जागा. याला रामसर कन्व्हेन्शन असे संबोधले जाते. रामसर कन्व्हेन्शन हा आंतरराष्ट्रीय करार (आंतर-सरकारी करार) असून, पाणथळ जागांचे संवर्धन आणि पाणथळ जागा व त्यांच्या स्रोतांच्या सूज्ञ वापरासाठी राष्ट्रीय स्तरावरील कृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याची चौकट मांडतो.
पाणथळ जागेत काय आहे ?जैवभौगोलिक विविधता, वनस्पती, प्राणी; २० हजारांहून अधिक पाणपक्ष्यांची संख्या; दुर्मिळ आणि संकटग्रस्त पाणपक्षी प्रजाती; माशांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत, अंडी घालण्यासाठी अधिवास, स्थलांतर मार्ग
कांदळवने काय करतात?जमिनीची धूप कमी करतात. प्रदूषण नियंत्रण करतात. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करतात. भरती-ओहोटी, समुद्राच्या पाण्याच्या आक्रमणापासून संरक्षण करतात.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील पर्यावरण संरक्षणासह संवर्धनासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह महाराष्ट्र वन विभागाचा कांदळवन कक्ष प्रयत्न करत असतानाच आता स्वातंत्र्यदिनीच पर्यावरण क्षेत्राला या सकारात्मक वृत्ताने दिलासा दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरणाचे आणखी संरक्षण व संवर्धन होणार आहे.
ठाणे खाडीच्या पश्चिम किनारी मुंबई जिल्हा तर पूर्व किनाऱ्यावर ठाणे आणि नवी मुंबई आहे. ठाणे खाडीच्या दोन्ही किनारी कांदळवने असून, देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटींपैकी २० टक्के प्रजाती येथे आढळतात. ज्यामध्ये १३ खारफुटी प्रजाती आहेत. राखाडी खारफुटीच्या झाडांचा मोठा समूह आहे.
पाणथळ जागेचे मूल्य जागतिक जैवविविधतेत योगदान म्हणून ओळखले गेले आहे. क्षेत्राचे रक्षण करण्यासह जैवविविधता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.- वीरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष
जैवविविधतेची उच्च क्षमता असलेला हा प्रदेश पर्यावरणीय हॉटस्पॉट आहे. वातावरण बदलाच्या सध्याच्या कठीण काळात ही घोषणा या क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास सक्षम करेल. - डॉ. अफ्रोज अहमद, माजी सदस्य, राष्ट्रीय पाणथळ जागा समिती, केंद्रीय पर्यावरण, वने,वातावरण बदल मंत्रालय