- लीनल गावडे, मुंबईनवरात्र म्हटल्यावर तरुणाईला आठवतो गरबा आणि दांडिया. गरबा, दांडिया खेळण्याची प्रॅक्टिस तरुणाईने आधीपासूनच सुरू केली आहे. बाजारातही दांडियांचे नवनवीन प्रकार दिसून येत आहेत. दांडिया खेळताना हात दुखू नयेत म्हणून तरुणाईने यंदा हलक्या टिपऱ्यांना पसंती दिली आहे. नवरात्रासाठी शहरातील विविध बाजारपेठा सज्ज झाल्या असून विविध रंगांनी खुलून गेल्या आहेत. गरब्याच्या कपड्यांच्या बरोबरीनेच विविध रंगांच्या, आकाराच्या टिपऱ्या बाजारात दिसून येत आहेत. मेटलच्या असूनही अॅल्युमिनियमच्या टिपऱ्या वजनाने हलक्या असल्याने यंदा या टिपऱ्यांचा खप जास्त झाला आहे. अॅल्युमिनियमच्या टिपऱ्यांवर केलेल्या कारागिरीमुळे त्या तरुणाईला अजूनच आकर्षित करत आहेत. अॅल्युमिनियमच्या टिपऱ्यांवर लाल, हिरवा, पिवळा, मोरपिशी, निळा, केशरी, गुलाबी असे सिंगल कलर अथवा मल्टी कलरमध्ये या टिपऱ्या उपलब्ध आहेत. या कलरमुळे तरुणांच्या बरोबरीनेच महिलांनाही या टिपऱ्या आकर्षित करत आहेत. या टिपऱ्यांची किंमत ७० ते १५० रुपये इतकी आहे. याच टिपऱ्यांबरोबर प्लास्टिक आणि कचकड्यापासून बनवलेल्या टिपऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत १०० ते २०० रुपयांपर्यंत आहे. लाकडाच्या वजनाने हलक्या टिपऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. हँड पेंटिंग केलेल्या टिपऱ्यांपासून ते कुंदन, मोती, खडे यांचा वापर करून सजवलेल्या डिझायनर टिपऱ्या आहेत. यंदा वेलवेटचा वापर केलेल्या टिपऱ्या खऱ्या अर्थाने आकर्षून घेणाऱ्या आहेत. नुसत्या लाकडावर कोरीव काम करून रंगवलेल्या वा बांधणीचा कापड गुंडाळलेल्या टिपऱ्यासुद्धा आहेत. सोनेरी, चंदेरी लेसेस गुंडाळलेल्या टिपऱ्यादेखील अनेक तरुणींच्या पसंतीस उतरत आहेत यांची किंमत साधारणत: १०० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यत आहे. गरब्याला जाण्यासाठी घेतलेल्या पोषाखाला मॅचिंग टिपऱ्या घेण्याचाही ट्रेण्ड यंदा दिसत आहे. अॅल्युमिनियम आणि लाकडाच्या पर्यायात उपलब्ध आहेत. या टिपऱ्यांना थोडा हटके लूक देण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकाराचे लटकन, मोती, खडे, लच्छांचा वापर केलेला दिसतो.पुरुषांसाठी दांडिया : महिलांबरोबरच पुरुषांसाठीसुद्धा खास दांडिया आहेत. रोलिंग दांडिया हा प्रकार सर्रास पुरुष वापरतात. ही एकच दांडी असते. एका हातातील मधल्या बोटात घालून दांडिया खेळतात. हा प्रकार अॅल्युमिनियममध्ये मिळतो. यातही इतर दांडियांसारखे रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. या दांडियांची किंमत १०० रुपये इतकी आहे.
हलक्याफुलक्या टिपऱ्या
By admin | Published: October 10, 2015 4:39 AM