बनावट दस्तावेजांच्या आधारे ६० लाखांचा फ्लॅट
By admin | Published: December 25, 2015 03:18 AM2015-12-25T03:18:02+5:302015-12-25T03:18:02+5:30
खोटे दस्तावेज तयार करून, ६० लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करणाऱ्या एका कंपनीच्या गोदाम व्यवस्थापकाविरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : खोटे दस्तावेज तयार करून, ६० लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करणाऱ्या एका कंपनीच्या गोदाम व्यवस्थापकाविरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश बन्सल असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे.
श्रीनारायण कंपनीचा गोदाम व्यवस्थापक असलेल्या राकेश बन्सल याच्याकडे उत्पादन पोहोचते केल्यावर, त्याच्या किमतीचे चेक ग्राहकांकडून घेण्याचे काम होते. याच दरम्यान
त्याने एका खासगी बँकेत खाते उघडले. आपण एक रिक्षा चालक-मालक असल्याचे त्याने या बँकेत सांगितले. याच खात्यात त्याने
८० लाखांहून अधिक रकमेचे चेक
जमा केले.
राकेश बन्सल याने बनावट खात्याचे स्टेटमेंट सादर करून, एका महिलेच्या नावावर ६० लाख रुपयांचा फ्लॅट मीरा रोड भागात खरेदी केला. या कंपनीचे एक प्रमुख भागीदार असलेले नारायण करवा यांना ३० आॅक्टोबर रोजी बँक आॅफ इंडियाच्या बोरीवली येथील शाखेतून एक फोन आला आणि आपल्याकडून गृहकर्जाचे दोन हप्ते थकले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ‘हे ऐकून आपल्याला धक्काच बसला.
म्हणून मी बँकेच्या त्या शाखेत गेलो, तेव्हा माझ्या सांताक्रुझ येथील गोदामातून व्यवहार करण्याची परवानगी देणारा बनावट करारनामा राकेश बन्सलची सहकारी रजनी बिश्त हिने तिथे सादर केला होता. हे अनपेक्षितच होते,’ असेही करवा यांनी सांगितले. ‘रजनीने बनावट आयटी रिटर्न्सही, तसेच सीएने प्रमाणित केलेले अॅडव्हान्स टॅक्स चलानही सादर केले होते.
त्याद्वारे कंपनीला गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ११ लाख, १३ लाख आणि १७ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले होते. माझ्या कंपनीच्या नावे उघडण्यात आलेल्या खोट्या खात्याचे स्टेटमेंटही दिले होते,’ असेही करवा म्हणाले. (प्रतिनिधी)