लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडत असल्या तरी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या घरांची खरेदी विक्री होते. मुंबईत फ्लॅट, घर घेतले किंवा बंगला बांधला तरी महापालिकेकडे त्याची नोंद करावी लागते. मुंबई महापालिका या घरमालकांकडून दरवर्षी कर आकारते. मालमत्ता कर हे मुंबई महापालिकेच्या उत्पन्न स्रोतांपैकी एक आहे.
मुंबईकरांना महापालिकेद्वारे विविध नागरी सेवासुविधा पुरविल्या जातात. या अनुषंगाने ‘मालमत्ता कर’ हा मुंबई पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतकी झाली होती. गेल्या दोन महिन्यांत पालिकेने २३६ कोटींचा मालमत्ता कर गोळा केला आहे.
६ हजार कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट
मालमत्ता विभागाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात २३६ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. पालिकेने गेल्यावर्षी जुलैपर्यंत ३५० कोटींचा मालमत्ता कर वसूल केला होता. यंदा पालिकेने ६ हजार कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
मालमत्ता करातून सूट
मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट दिली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी हा निर्णय घेण्यात आला. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे तसेच ही सुरुवात असून मालमत्ता कर डिसेंबरनंतर मोठ्या संख्येने भरला जातो अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
३९ लाख घरे मुंबईत
मुंबई पालिकेकडे ३९,०७,२११ इतक्या घरांची नोंद आहे. या घरमालकांकडून दर वर्षाला महापालिका मालमत्ता कर आकारते. विविध विभागानुसार मालमत्ता कराच्या किमती पालिकेने निर्धारित केल्या असून ऑनलाइन, रोख अथवा धनादेशाच्या स्वरूपात कर आकारते.
कठोरपणे कर आकारू शकत नाही
मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी बिले पाठविली जातात. बिले पाठविल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत हे बिल भरावे लागते. हे बिल भरले नाही तर पालिका थकबाकीदारांना स्मरणपत्र आणि नोटीस पाठविते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका मालमत्ता कर कठोरपणे वसूल करू शकत नाही. तशी वसुली करायची झाल्यास राज्य सरकारला बीएमसी कायद्यात सुधारणा कराव्या लागतील, असेही त्यांनी सांगितले.