Join us

विरारमधील फ्लॅटच्या किंमती म्हाडाने ३ लाखाने घटवल्या

By admin | Published: November 18, 2014 11:02 PM

म्हाडाच्या विरार येथील मध्यम उत्पन्न गटासाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या १५०० फ्लॅटच्या किमती ३ लाखाने कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

विरार : म्हाडाच्या विरार येथील मध्यम उत्पन्न गटासाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या १५०० फ्लॅटच्या किमती ३ लाखाने कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. तिने आपल्या किंमत धोरणात केलेल्या बदलामुळे हा लाभ फ्लॅट धारकांना होणार आहे. जुलै मध्ये या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्याचा लाभ या दोनही गटातील १५०० अर्जदारांना झाला होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जो फ्लॅट २६ लाखाला विकला गेला. त्याची किंमत आता २३ लाख आणि मध्यम उत्पन्न गटातील जो फ्लॅट ४५ लाखाला विकला गेला त्याची किंमती ४२ लाख अशी आकारली जाणार आहे. म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली संदानसिंग यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, या घरांच्या खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जावर पूर्वीच्या धोरणानुसार १४.५० टक्के व्याज आकारले जाणार होते. ते ही आता १०.५० टक्के आकारले जाणार आहे. त्यामुळे त्याचाही फायदा या फ्लॅट ग्राहकांना मिळणार आहे. व्याजदरातील फरका बाबतचा निर्णय या आठवडाभरात अंतिम होईल. या फ्लॅटची संख्या मोठी होती व त्याची उभारणी विक्रमी वेळेत झाली. त्यामुळे त्याची जी किंमत आम्ही गृहित धरली होती. त्यापेक्षा खूपच कमी किमतीत ते साकार झाले. त्यामुळे त्याचा फायदा आम्ही आमच्या ग्राहकांना देणार आहोत. केवळ याच फ्लॅटलाच नव्हे तर भविष्यात बांधल्या जाणाऱ्या फ्लॅटच्या किंमतीही या नव्या धोरणानुसार निश्चित होणार असल्यामुळे त्या ही अशाच कमी असतील. त्यापुढे म्हणाल्या की, या नव्या किंमत धोरणाला म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाची मान्यता घेणे बाकी असून ती औपचारिकता या आठवड्यात पूर्ण झाली की, सर्व फ्लॅट धारकांना व्याज आणि किंमतीतील हा बदल कळविण्यात येईल व त्याची अमलबजावणी होऊन त्याचा फायदा त्यांना प्रत्यक्षात प्राप्त होईल. (विशेष प्रतिनिधी)