Join us

झोपडीवाल्यांचे फ्लॅट सेलिब्रिटींना विकले! ‘कुणाल’ला दणका, ७ कोटींची मालमत्ता जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 6:31 AM

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये परळ येथील एक फ्लॅट आणि कुणाल बिल्डर कंपनीचा मालक शैलेश सावला व त्याची पत्नी जयश्री सावला यांच्या नावे असलेल्या बँकेतील मुदत ठेवींचा समावेश आहे.

मुंबई : जुहू ताज स्लम सोसायटी या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील घरे मूळ झोपडपट्टीवासीयांना न देता त्या घरांची विक्री सेलिब्रिटी, माजी लष्करी अधिकारी, पोलिस अधिकारी यांना करणाऱ्या कुणाल बिल्डरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत त्यांची ६ कोटी ९३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये परळ येथील एक फ्लॅट आणि कुणाल बिल्डर कंपनीचा मालक शैलेश सावला व त्याची पत्नी जयश्री सावला यांच्या नावे असलेल्या बँकेतील मुदत ठेवींचा समावेश आहे.

हे प्रकरण २००६ मधील असून जुहू ताज स्लम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम कुणाल बिल्डरतर्फे करण्यात येत होते. मूळ झोपडपट्टीवासीयांची नावे गाळून त्यांच्या जागी बोगस कागदपत्रे तयार करत भलत्याच लोकांची नावे त्याने घुसवली होती. यामध्ये काही सेलिब्रिटी, माजी लष्करी अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 

११२ कोटींचे नुकसान  - कमेन्समेंट सर्टिफिकेट न घेताच काम सुरू केले. पुनर्विकासातील १३३ घरे मूळ झोपडीवासीयांना दिली नाहीत. झोपडीवासीयांची इमारत बांधल्यानंतर उर्वरित जागेवरील ‘सेल’ इमारतीत मे. चिंतन लाइफस्पेस एलएलपी या कंपनीला काही घरे मोफत देण्याचे आश्वासन पाळले नाही. - शैलेश सावला याने महाराष्ट्र राज्य सरकार व  चिंतन लाइफस्पेस कंपनीचे ११२ कोटी ५० लाखांचे नुकसान केले. आतापर्यंत ४५ कोटी ४३ लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ज्यावेळी कुणाल बिल्डरविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा ईडीने दाखल केल्याचे समजले त्यानंतर सेलिब्रिटी व अधिकाऱ्यांनी आपली घरे विकून टाकली. 

टॅग्स :धोकेबाजीअंमलबजावणी संचालनालय